
इराण-इस्त्रायल युद्ध थांबल्यानंतर अमेरिकेच्या ट्रेड वॉरकडे जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि चीन दरम्यान ट्रेड वॉर सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने चीनसोबत करार केला असल्याचे स्पष्ट केले. तसेच भारतासोबत लवकरच खूप मोठा करार होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले.
आपल्या भाषणात व्यापार करारांचा उल्लेख करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेसोबत प्रत्येकजण करार करू इच्छितो आणि कराराचा भाग बनू इच्छितो. काही महिन्यांपूर्वी ट्रेड डीलसाठी कोणी रस घेईल का? असा प्रश्न विचारला जात होता. आता आम्ही कालच चीनसोबत करार केला आहे. आम्ही काही चांगले करार करत आहोत. आम्ही आणखी एक महत्वाचा करार करणार आहोत. कदाचित भारतासोबत हा करार असणार आहे. तो खूप मोठा करार असेल.
भारताचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, आम्ही आणखी एक करार करणार आहोत. आम्ही भारतासाठी दरवाजे उघडणार आहोत. चीनसोबतच्या करारात आम्ही चीनसाठी दरवाजे उघडले आहेत. या गोष्टी ज्या कधीच घडू शकल्या नसत्या, त्या होत आहेत. आमचे प्रत्येक देशाशी चांगले संबंध आहेत, असे त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही सर्वांसोबत करार करणार नाही. काही लोक फक्त पत्र पाठवून आभार मानणारे आहेत. तुम्ही तुमच्या देशात अमेरिकन उत्पादनांना कर लावला तर त्या प्रमाणे तुम्हाला २५, ३५, ४५ टक्के कर भरावा लागेल. आमचे काही लोक तसे करू इच्छित नाहीत. त्यांना काही वेगळे सौदे करायचे आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले. पण आम्ही काही उत्तम करार करत आहोत.
ट्रम्प यांनी चीन कराराच्या तपशीलांबद्दल माहिती दिली नाही. परंतु व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा करार चीनमधून अमेरिकेला Rare Earth Shipments ला गती देण्यावर केंद्रित होता. हा एक मुद्दा होता, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. जिनेव्हा कराराच्या अंमलबजावणीसाठी चीनने सामंजस्य करारावर सहमती दर्शविली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.