
एपस्टीनशी असलेल्या कथित संबंधांबद्दल वाढत्या जागतिक दबावानंतर दुबईच्या प्रमुख बंदर कंपनीच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. गुंतवणूक ठप्प होण्याच्या धोक्याच्या इशारादरम्यान कंपनीने नवीन नेतृत्वाची नियुक्ती केली. या घटनेची जगभरात मोठी चर्चा सुरू आहे.
अमेरिकेतील लैंगिर गुन्हेगार जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंधित कागदपत्रं, पुरावे समोर येताच जगभरातील अनेक मोठी, महत्वाच्या व्यक्तींची नावंही समोर येत आहेत. आखाती देशांमधील मोठ्या व्यक्तिमत्त्वांबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणात आता दुबईतील एका मोठ्या उद्योगपतीला राजीनामा द्यावा लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एपस्टाईनसोबत व्यवसायाच्या संधी शोधण्याचा प्रयत्न करत होता तसेच महिलांबद्दल चर्चा करायचा, त्यादरम्यान त्याने एकदा “100% रशियन महिला” असा उल्लेख केल्याची माहितीही समोर आली आहे.
गेला पहिला बळी
दुबईतील एका प्रमुख बंदर आणि लॉजिस्टिक्स कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलयम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या नावाभोवती वाद वाढत असताना आणि आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला. या कंपनीचा व्यवसाय कॅनडा आणि भारतासह अनेक देशांमध्ये पसरलेला आहे, म्हणूनच या घटनेकडे जागतिक व्यावसायिक जगात एक मोठा बदल म्हणून पाहिले जात आहे.
अलिकडेच काही कागदपत्र उघडकीस आल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांची नावे चौकशी आणि छाननीत आली, त्यात मध्य पूर्वेतील एक प्रमुख व्यावसायिक व्यक्ती बिन सुलायम यांचाही समावेश होता. वाद वाढल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र या आठवड्यात एक ब्रिटिश विकास वित्त एजन्सी आणि एक प्रमुख कॅनेडियन पेन्शन फंड या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांनी कंपनीतील नवीन गुंतवणूक थांबवण्याची घोषणा केली तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनली.
कंपनीत भारतीय नागरिकाची सीईओ म्हणून नियुक्ती
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुबईच्या शासकाने डीपी वर्ल्डसाठी नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याचा आदेश जारी केला आहे, हे पद पूर्वी बिन सुलायम यांच्याकडे होतं. एसा काझीम यांची संचालक मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर युवराज नारायण यांची समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काझीम हे सध्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरचे गव्हर्नर आहेत, तर नारायण हे 2004 सालापासून कंपनीशी संबंधित आहेत आणि त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. जागतिक कंटेनर वाहतुकीत त्यांचा वाटा १० टक्के आहे आणि ती अनेक खंडांमध्ये कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
बिझनेस टायकूनबद्दल एपस्टाईन फाइल्समध्ये काय खुलासे ?
जानेवारीमध्ये समोर आलेल्या एपस्टाईन फाईल्समधाल कागदपत्रांमध्ये, या संबंधाची माहिती उघड झाली होती, ज्यामध्ये दोघे एकमेकांसाठी व्यवसायाच्या संधी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि महिलांबद्दल चर्चा करत असल्याचे दिसून आलं. “तू कुठे आहेस? ठीक आहेस ना? मला तो टॉर्चरचा व्हिडिओ खूप आवडला” असं 2009 च्या एका ईमेलमध्ये एपस्टाईनने लिहिलं होतं. मात्र तो कोणत्या व्हिडिओचा उल्लेख करत होता हे स्पष्ट झालं नाही.
ही कागदपत्र प्रथम उघड झाली तेव्हा या उद्योजकाचे, टायकूनचे नाव लपवण्यात आलं होतं, मात्र सुनावणीदरम्यान त्याची ओळख समोर आली. 2008 मध्ये अल्पवयीन मुलीच्या वेश्याव्यवसायाशी संबंधित आरोपांवरून त्याला दोषी ठरवण्यात आल्यानंतरही ते दोघे वर्षानुवर्षे संपर्कात होते, असेही फायलींमध्ये दिसून आले आहे. तर 2013 सालच्या ईमेलमध्ये, एपस्टाईनने लिहिलं की, “मला फक्त एवढंच माहिती आहे की तू माझ्या सर्वात विश्वासू मित्रांपैकी एक आहेस.” त्यावर बिन सुलायमने उत्तर देत त्याचे आभार मानले आणि लिहिलं, “माझ्या यॉटवर एक नवीन 100% रशियन महिला आहे.”