
अफगाणिस्तानात एका 13 वर्षाच्या मुलाने मोठा धोका पत्करला. ते समजल्यानंतर सगळेच जण हैराण झाले आहेत. हा मुलगा प्रवासी विमानाच्या लँडिंग गिअर जवळ बसून अफगाणिस्तानातून दिल्लीत आला. तो 94 मिनिटं हवेमध्ये होता. काबूलमधून विमानाने उड्डाण केलं, त्यावेळी विमानाच्या मागच्या चाकामध्ये जाऊन हा मुलगा लपला. फ्लाइटच लँडिंग झाल्यानंतर मुलगा विमानाच्या चाकात बसून अफगाणिस्तानातून दिल्लीत आल्याच समजलं.अफगाणिस्तान एअरलाइन्सच्या केएएम एअरच्या फ्लाइटमध्ये रविवारी ही घटना घडली.
रविवारी सकाळी 11 वाजता फ्लाइटने लँड केलं, त्यावेळी सगळ्यांची नजर त्या मुलावर पडली. सूत्रांनी सांगितलं की, त्या मुलाला त्याच दिवशी रविवारी त्याच विमानातून परत पाठवून देण्यात आलं. पण मुलाला परत पाठवण्याआधी त्याची चौकशी केली. या चौकशीत मुलाने सांगितलं की, का तो विमानाच्या चाकांमध्ये बसून दिल्लीला आला.
CISF च्या ताब्यात दिलं
एअरलाइन अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांनी एअरपोर्टच्या कंट्रोल रुमला मुलाबद्दल माहिती दिली. विमान उतरल्यानंतर तो विमानाच्या आसपास फिरताना दिसला. चौकशीत समजलं की, मुलगा कुंदुंज शहरात राहणारा आहे. मुलाला एअर लाइन्स कर्मचाऱ्यांनी पकडलं व CISF च्या ताब्यात दिलं. चौकशीसाठी त्याला एअरपोर्टच्या टर्मिनल 3 वर आणलं.
मुलगा विमानाच्या चाकात लपून भारतात का आलेला?
मुलाने अधिकाऱ्यांना सांगितलं की, तो काबूल विमानतळात घुसला. सगळ्यांची नजर चुकवून तो लँडिंग गिअरच्या डब्ब्यात घुसण्यात यशस्वी ठरला. मुलाला विमानाच्या चाकात बसून दिल्लीत येण्याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी तो म्हणाला की, जिज्ञासा, कुतूहल यापोटी त्याने हे सर्व केलं.
विमानाच्या चाकामध्ये लपून प्रवास करणं किती धोकादायक?
अशा प्रकारे विमानाच्या चाकांमधून लपून प्रवास करण्याला “व्हील-वेल स्टोवेज” (wheel-well stowaways) म्हणतात. यात प्रवासी विमानाच्या व्हील-बे किंवा अंडरकॅरेजमध्ये लपतात. विमान हवेत असताना या ठिकाणी बसणं सोपं नसतं. विमान जास्त उंचावर गेल्यानंतर थंडावा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. असा प्रयत्न जीवघेणा ठरु शकतो.
विमानाच्या चाकामध्ये बसून प्रवास करणं खूप खतरनाक असतं. अशी अनेक प्रकरणं आहेत. जानेवारी 2024 मध्ये डोमिनिकन वरुन फ्लोरिडाला जाणाऱ्या जेटब्लूच्या विमानात लँडिंग गिअरमध्ये दोन मृतदेह मिळाले होते. 2021 साली एक ग्वाटेमालाचा नागरिक मियामी फ्लाइट दरम्यान अनेक तास व्हीलमध्ये लपून राहिल्यानंतर वाचला होता.