इस्त्राईलवर हिजबुल्लाहचा मोठा हल्ला, एकाच वेळी डागले 50 क्षेपणास्त्र पण आयरन डोमने पुन्हा दाखवली कमाल

Middle East Crisis: इस्त्राईलला सध्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर संघर्षाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गाझा आणि रफाहमध्ये हमासच्या विरोधात लष्करी कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे आता लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाहशी सामना करावा लागत आहे.

इस्त्राईलवर हिजबुल्लाहचा मोठा हल्ला, एकाच वेळी डागले 50 क्षेपणास्त्र पण आयरन डोमने पुन्हा दाखवली कमाल
israel war
| Updated on: Aug 04, 2024 | 8:50 AM

इस्राईलने हमासचा प्रमुख कमांडर इस्माइल हानिया याचा इराणमध्ये घुसून खात्मा केला. त्यानंतर इराण, हमास पेटले आहे. त्यांच्याकडून कधीही इस्त्राईलवर हल्ला होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी इराण समर्थक अतिरेकी संघटना हिजबुल्लाहने इस्त्राईलवर एकामागे एक इस्त्राईलवर डागले. हिजबुल्लाहने शनिवारी संध्याकाळी दक्षिण लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये हल्ला केला. परंतु इस्राईलच्या हवाई संरक्षण प्रणाली आयर्न डोमने सर्व क्षेपणास्त्र निकामी केले. अनेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या हल्ल्यात इस्त्राईलचे काहीच नुकसान झाले नाही.

का केला हिजबुल्लाने हल्ला

इस्त्राईलला सध्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर संघर्षाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गाझा आणि रफाहमध्ये हमासच्या विरोधात लष्करी कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे आता लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाहशी सामना करावा लागत आहे. इराणकडून इस्त्राईलविरोधात कारवाईची तयारी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी इस्त्राईलने लेबनानमध्ये हवाई हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 17 वर्षीय मुलगा ठार झाला होता. तसेच सहा जण जखमी झाले होते. त्यामुळे आता हिजबुल्लाने हा हल्ला केला.

इराण-समर्थित अतिरेकी गट हिजबुल्लाहचा प्रमुख कार्यकर्ता अली अब्द अली हा टायरजवळील दक्षिण लेबनॉनमधील बाजोरीह येथे शनिवारी सकाळी इस्राईली ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता. इस्राईली सैन्याने मारले गेलेल्या अली याला हिजबुल्लाच्या दक्षिण आघाडीवर प्रमुख दहशतवादी म्हटले होते.

असा सुरु झाला संघर्ष

हिजबुल्लाहने 28 जुलै रोजी इस्त्रायली-व्याप्त गोलान हाइट्स भागातील फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला केला होता. त्यात 12 मुलांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इस्राईलने हमासप्रमाणे हिजबुल्लाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. या रॉकेट हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर 30 जुलै रोजी इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला केला. त्यामध्ये हिजबुल्लाहचा सर्वोच्च कमांडर फौद शुकर मारला गेला होता. गोलान हाइट्स फुटबॉल मैदानावर झालेल्या रॉकेट हल्ल्यासाठी इस्रायलने शुकरला जबाबदार ठरवले होते.

अमेरिका आणि इंग्लंडने इस्त्राईमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना तातडीने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे. उपलब्ध असलेल्या कोणत्याही तिकीटवर निघून या, असे या देशांनी म्हटले आहे. इस्त्राईलवर इराण आणि हमासकडून होणारा हल्ला लक्षात घेता हा सल्ला या राष्ट्रांनी दिला आहे.