
गेल्या काही काळापासून ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून जागतिक स्तरावरील राजकारण तापले आहे. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करण्याची तयारी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प कधीही हा देश ताब्यात घेऊ शकतात. अशातच आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडला उघड धमकी दिली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक बैठकीत बोलण्यासाठी ट्रम्प यांना 20 मिनिटे देण्यात आली होती, परंतु त्यांनी एक तासाहून अधिक वेळ भाषण दिले. WEF व्यासपीठावरून ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याची भूमिका मांडली. अमेरिकेशिवाय कोणताही देश किंवा देशांचा गट ग्रीनलँडचे संरक्षण करू शकत नाही असंही ते म्हणाले.
ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले की, ‘नाटो देश आता त्यांच्या सुरक्षेत पूर्वीपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहेत. जर मी ठरवले तर मी अधिक शक्ती वापरू शकतो आणि कोणीही मला रोखू शकणार नाही, परंतु आम्ही ते करणार नाही. आमच्या मागण्या फार मोठ्या नाहीत. अमेरिकेला फक्त ग्रीनलँड नावाची जागा हवी आहे. आम्हाला हिंसाचार किंवा जबरदस्तीशिवाय हे करायचे आहे. मला शक्ती वापरायची नाही. जर तुम्ही हो म्हणाला तर ते कौतुकास्पद आहे; तुम्ही नाही म्हणू शकता आणि आम्ही ते लक्षात ठेवू’ असं म्हणत ट्रम्प यांनी धमकी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कला कृतघ्न म्हटले. ते म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धात डेन्मार्क जर्मनीकडून फक्त सहा तासांत हरला. ते स्वतःचे किंवा ग्रीनलँडचे रक्षण करू शकले नाही. त्यावेळी अमेरिकेने डेन्मार्क आणि ग्रीनलँडचे रक्षण केले होते, परंतु नंतर ग्रीनलँड डेन्मार्कला परत केले. आज डेन्मार्क अमेरिकेचे योगदान मान्य करत नाही, जे चुकीचे आहे. आम्ही ग्रीनलँड का मिळवू इच्छित आहे, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता यामागे कारण आहेत. तसेच ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान देखील महत्त्वाचे आहे.
पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. जेव्हा अमेरिकन अर्थव्यवस्था वेगाने वाढते तेव्हा संपूर्ण जगाला फायदा होतो. म्हणजे “जर अमेरिका आनंदी असेल तर जग आनंदी असेल.” पुढे बोलताना त्यांनी अमेरिकेच्या सत्तेच्या काळात व्हेनेझुएला आता अधिक पैसे कमवेल असंही विधान केले आहे.