इकडे इमरान खान तुरुंगात, तिकडे बायको जेमिमाने अब्जाधीशाशी केले दुसरे लग्न; कोण आहे तो?
Imran Khan ex wife Jemima wedding news: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे तुरुंगात असताना त्यांच्या पूर्व पत्नीने दुसरे लग्न केले आहे. तिने एका अब्जाधीशाशी दुसरे लग्न केले आहे. तो कोण आहे? वाचा...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्व पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी दुसरे लग्न केले आहे. इमरान खान पाकिस्तानमध्ये तुरुंगात असताना जेमिमा यांनी अब्जाधीश फाइनान्सर कॅमरॉन ओ’रेली यांच्याशी लग्न केले आहे. हे लग्न एक आठवडापूर्वी झाले आहे. गोल्डस्मिथ ५२ वर्षांच्या आहेत. त्या एक पटकथा लेखिका आहेत आणि डॉक्युमेंट्री बनवतात. त्या दिवंगत राजकुमारी डायना यांच्याही जवळच्या मैत्रिण होत्या. तर त्यांचे नवे पती ओ’रेली ६२ वर्षांचे आहेत.
अब्जाधीश फाइनान्सर ओ’रेली यांचा जन्म २८ एप्रिल १९६४ रोजी डब्लिन येथे अँथनी कॅमरॉन ओ’रेली म्हणून झाला होता. त्यांच्याकडे आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व आहे. त्यांचे वडील आयर्लंडचे मीडिया दिग्गज टोनी ओ’रेली होते. त्यांच्या आई ऑस्ट्रेलियन होत्या. त्यांनी ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेतले आहे. ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये आपली कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये काम केले. ऑस्ट्रेलियन फर्म एपीएन न्यूज अँड मीडियामध्ये जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या वडिलांची कंपनी ‘इंडिपेंडंट न्यूज अँड मीडिया’मध्ये दहा वर्षे घालवली. २००० मध्ये त्यांनी तेथे चीफ एक्झिक्युटिव्ह पद सोडले.
२००३ मध्ये ओ’रेली यांनी ‘बेयार्ड कॅपिटल’ नावाचा एक प्रायव्हेट इक्विटी फंड सुरू केला. ते त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह होते. नंतर २०११ मध्ये त्यांनी एनर्जी मीटरिंग कंपनी ‘लॅन्डिस+गायर’ २.३ अब्ज डॉलरमध्ये तोशिबाला विकली. ओ’रेली चार मुलांचे वडील आहेत. त्यांचे पहिले लग्न इल्से ओ’रेली यांच्याशी झाले होते. एका ब्लाइंड डेटवर भेटल्यानंतर १९९२ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. २० वर्षांच्या संसारानंतर २०२२ मध्ये ते आणि इल्से वेगळे झाले. ते २०१० पासून स्वित्झर्लंडच्या झुग येथे राहत आहेत.
जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी कशी झाली भेट?
गोल्डस्मिथ आणि ओ’रेली यांची भेट कामाच्या निमित्ताने झाली होती. डेटिंग सुरू करण्यापूर्वी ते काही काळ मित्र होते. दोघांनाही डॉक्युमेंट्री चित्रपट बनवण्यात रस आहे. ओ’रेली यांनी एक एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले होते आणि तिथेच दोघांची ओळख झाली. लग्नापूर्वी हे जोडपे एक वर्षाहून अधिक काळ डेटिंग करत होते. ते आपला वेळ स्वित्झर्लंडमधील ओ’रेली यांच्या घरी आणि वेस्ट लंडनमधील गोल्डस्मिथ यांच्या घरी असे विभागून घेतात.
जोडप्याच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की ओ’रेली खूप प्रायव्हेट व्यक्ती आहेत आणि गोल्डस्मिथ त्यांच्या या प्रायव्हसीला जपण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. जेमिमा मार्सेल गोल्डस्मिथ यांचा जन्म ३० जानेवारी १९७४ रोजी लंडनच्या चेल्सी येथे झाला होता. त्यांनी ‘इंस्टिंक्ट प्रोडक्शन्स’ नावाची टेलिव्हिजन प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती. त्यांचे वडील दिवंगत अब्जाधीश सर जेम्स गोल्डस्मिथ होते. त्यांच्या आई लेडी अॅनाबेल गोल्डस्मिथ होत्या, ज्यांचे निधन ऑक्टोबर २०२५ मध्ये झाले.