
सौदी अरेबियात मोठी दुर्घटना झाली आहे. कमीत कमी 42 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भारतीय उमरासाठी सौदीला गेले होते. सोमवारी सकाळी हे भारतीय बसमधून मक्का येथून मदीना येथे चाललेले. त्याचवेळी बसची डिझेल टँकर बरोबर धडक झाली. प्राथमिक रिपोर्टनुसार हा अपघात IST वेळेनुसार जवळपास 1:30 च्या सुमारास मुफरिहात जवळ झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ते सर्व हैदराबाद आणि तेलंगणचे रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्यावेळी बसमध्ये जवळपास 20 महिला आणि 11 लहान मुलं होती.
हे सर्व तीर्थयात्री उमराह अदा करण्यासाठी गेले होते. मक्का येथे धार्मिक अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर ते मदीना येथे चाललेले. याच दरम्यान हा अपघात झाला. अपघात घडला त्यावेळी प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत होते. स्थानिक सूत्रांनी 42 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टि केली आहे. आपातकालीन मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी अपघाताबद्दल काय माहिती दिली?
सौदी अरेबियातील या बस दुर्घटनेवर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “मक्क्याहून ही बस मदीना येथे चालली होती. 42 तीर्थयात्री असलेल्या या बसला आग लागली. मी रियाद येथील भारतीय दूतावासाचे उपमुख्य मिशनरी अबू माथेन जॉर्ज यांच्याशी बोललो आहे. या घटनेची माहिती घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे”
डॉ. एस. जयशंकर यांना काय विनंती ?
“मी हैदराबाद येथील दोन ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधला. प्रवाशांची माहिती रियाद दूतावास आणि परराष्ट्र सचिवांना दिली. मी केंद्र सरकार खासकरुन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना विनंती करतो की, अपघातग्रस्तांचे मृतदेह भारतात आणावेत. जर, कोणी जखमी असेल तर त्यांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत” असं खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला?
तेलंगणचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी यांनी बस दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी यात मुख्य सचिव (CS) आणि डीजीपी यांना केंद्र आणि सौदी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा आणि आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्याचा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन सीएस रामकृष्ण राव यांनी दिल्लीत उपस्थित रेजिडेंट कमिश्नर गौरव उप्पल यांना सतर्क केलं. राज्यातील किती लोक या अपघातग्रस्त वाहनात होते, त्याची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. सचिवालयात एक कंट्रोल रुमही स्थापित करण्यात आला आहे असं तेलंगण CMO ने म्हटलं आहे.