Saudi Arabia-Pakistan : भारताविरुद्ध युद्ध झाल्यास आता सौदी अरेबिया सुद्धा रणांगणात उतरणार का? पाकिस्तानचा मोठा दावा
Saudi Arabia-Pakistan : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट (SMDA) असा करार झाला आहे. या कराराची सगळीकडे चर्चा आहे.कारण पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेला हा करार नाटो देशांसारखा आहे.

पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये 17 सप्टेंबरला एक महत्वपूर्ण सैन्य करार झाला. स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट (SMDA) असं या कराराच नाव आहे. या कराराची सगळीकडे चर्चा आहे. कारण पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेला हा करार नाटो देशांसारखा आहे. इस्रायलने कतरची राजधानी दोहामध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये तातडीने असा करार झाला. उद्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास सौदी अरेबियाही त्यात उतरेल असे संकेत पाकिस्तानने दिले आहेत. कारण दोघांपैकी कुठल्याही एकादेशावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल असा हा करार सांगतो.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांना जीओ टीव्हीवरील मुलाखतीत विचारण्यात आलं की, उद्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास या नव्या करारानुसार सौदी अरेबिया त्यात सहभागी होणार का? त्यावेळी उत्तर देताना ख्वाजा असीफ यांनी भारताचं नाव घेतलं नाही. पण ते म्हणाले की, “हो नक्कीच, अजिबात शंका नाही. अमुक एक देश आक्रमक आहे, असं आम्ही कुठल्या देशाच नाव घेतलेलं नाही.सौदीने सुद्धा नाव घेतलेलं नाही. हल्ला कुठूनही झाला, तर आम्ही संरक्षण करणार. उत्तर एकत्र येऊन देणार”
सौदी अरेबियाला पाकिस्तानची अणवस्त्र वापरता येतील का?
दोन देशांमध्ये झालेल्या करारांतर्गत पाकिस्तानची अणवस्त्र क्षमता सौदी अरेबियाला वापरता येणार का? त्यावर ख्वाजा असिफ यांनी परस्परविरोधी वक्तव्य केलं. जिओ टीव्हीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत पाकिस्तानची अणवस्त्र क्षमता सौदी अरेबियाला उपलब्ध करुन दिली जाईल असं ते म्हणालेले. “पाकिस्तानच्या अणवस्त्र क्षमतेबद्दल मी एक गोष्ट स्पष्ट करतो, आम्ही फार पूर्वीच अणवस्त्र क्षमता मिळवली आहे. त्यानंतर युद्धासाठी आम्ही आमच्या फोर्सेसना तयार केलं. आमच्याकडे जी क्षमता आहे, ती करारानुसार सौदी अरेबियाला उपलब्ध करुन दिली जाईल” असं ख्वाजा असिफ म्हणाले.
कराराचा विस्तार केला जाऊ शकतो का?
रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा असिफ यांनी परस्परविरोधी वक्तव्य केलं. “अणवस्त्र या कराराच्या रडारवर नाहीत. अन्य आखाती देशांचा समावेश करण्यासाठी या कराराचा विस्तार केला जाऊ शकतो” असं ख्वाजा असिफ म्हणाले.
