
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान नागरिकांना भारतात नो एन्ट्री केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी भारताचे दरवाजे उघडे केले आहे. अफगाणिस्तानी नागरिकांना आता भारताचा व्हिसा देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या ‘न्यू अफगान व्हिसा’ धोरणानुसार ही सेवा सुरु केली आहे. अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना भारतात उपचार करायचे आहेत, त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, व्यापारी, यूएन डिप्लोमॅट यांनाही व्हिसा दिला जाणार आहे. पाच वर्ष भारत आणि अफगाणिस्तानमधील व्हिसा सेवा बंद होती.
अफगाणिस्तानमधील नागरिकांना व्हिसाचा अर्ज देताना एक फोटो, पासपोर्टची माहिती, एक इतर ओळखपत्र पोर्टलवर सबमिट करावा लागणार आहे. भारताने घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध सामान्य होत आहे. अफगाणिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले होते. पहलगाम हल्ल्याचा निषेधही केला होता. तसेच तालिबान सरकारने भारताला सांगितले की, अफगाणिस्तानच्या जमिनीवरुन दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही.
अफगाणिस्तानसोबत भारताचे संबंध सुधारत असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात असणारे दहशतवादी, डूरंड लाइनचा वाद यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव आहे.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत असलेले सर्व संबंध स्थगित केले. सिंधू जलकरार स्थगित करत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला. तसेच सीमा बंद करत दोन्ही देशांमधील व्यापारही थांबवला.
मागील महिन्यात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर अफगाणिस्तान तालिबान सरकारमधील समकक्ष मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्यासोबत चर्चा केली होती. तालिबान सरकार आल्यानंतर ही पहिलीच चर्चा दोन्ही देशांमध्ये झाली. तसेच भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान चाबहार पोर्टसंदर्भातही करार झाला आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरसाठीही दोन्ही देश काम करत आहे. हा कॉरिडोर भारतातून इराण, रशियामार्ग यूरोपला जोडणारा आहे. या दोन्ही महत्वाच्या प्रकल्पांवर भारत-अफगाणिस्तानसोबत आहे तर दोन्ही देशांचे पाकिस्तानसोबत संबंध चांगले नाहीत.