
यावर्षी डिसेंबर महिन्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या या दौऱ्याबद्दल ते खूप उत्साहित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलय. या खास दौऱ्याआधी पुतिन यांनी रशियन सरकारला महत्वाचे निर्देश दिलेत. भारतासोबत व्यापार असंतुलन कमी केलं जाईल. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्तात कच्चा तेलाची खरेदी करतोय, त्यावेळी पुतिन यांनी हे स्टेटमेंट केलय. भारत जितकी रशियाकडून तेल खरेदी करतो, त्या तुलनेत रशिया मात्र भारतीय सामानाची आयात करत नाही.
“रशिया आता भारताकडून जास्त कृषी उत्पादनं, औषधं आणि अन्य वस्तू खरेदी करण्याची योजना बनवत आहे. जेणेकरुन दोन्ही देशांमध्ये व्यापार संतुलन चांगलं राहील“ असं पुतिन म्हणाले. “हे व्यापार असंतुलन संपवण्यासाठी रशियाला पावलं उचलावी लागतील. सरकारला यावर काम करण्यास सांगण्यात आलं आहे“ असं पुतिन यांनी स्पष्ट केलं.
भारताचा विश्वासू सहकारी
रशियाच्या दक्षिणेकडील शहर सोचीमध्ये आयोजित वल्दाई डिस्कशन क्लबमध्ये ते बोलत होते. पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांच्या महत्वावर प्रकाश टाकला. “भारत-रशियामध्ये कधी कुठला तणाव किंवा वाद राहिलेला नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेपासून रशिया भारताचा विश्वासू सहकारी राहिला आहे” असं पुतिन म्हणाले.
नरेंद्र मोदींना आपलं मित्र म्हटलं
‘भारत रशियाची मदत कधी विसरलेला नाही. आजही दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि विश्वासाच नातं कायम आहे‘ असं पुतिन म्हणाले. त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं मित्र म्हटलं. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारला पुतिन संतुलित, समजदार आणि देशहितासाठी काम करणारं सरकार मानतात“
नुकसानीची भरपाई केली
अमेरिकेचा दबाव असूनही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताचं कौतुक केलं. या निर्णयामुळे भारताचा फक्त आर्थिक फायदाच झालेला नाही, तर स्वतंत्र आणि संप्रभु देशाची प्रतिमा अजून मजबूत झालीय असं पुतिन म्हणाले. अमेरिकेने लावलेले दंडात्मक टॅक्स भारतासाठी नुकसानदायक ठरले असते. पण भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करुन या नुकसानीची भरपाई केली. पुतिन यांनी याला एक साहसिक आणि दूरदृष्टीचा निर्णय म्हटलं.
रशिया भारताकडून काय खरेदी करणार?
पुतिन म्हणाले की, “रशियाला आता भारताकडून जास्त प्रमाणात धान्य, फळं, भाज्या आणि औषधं खरेदी करायची आहेत. भारत-रशिया व्यापारात लॉजिस्टिक्समध्ये अनेक आव्हानं आहेत. या समस्या सोडवून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अजून मजबूत होऊ शकतात“