पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातून निमंत्रण, काय आहे कारण?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सध्या खूपच ताणले गेलेले आहेत. भारतात झालेल्या हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यवहार बंद केले होते. त्यानंतर भारताने कलम ३७० रद्द केले, सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्टाईक केला त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर आरोप केले होते. त्यातच मोदींना पाकिस्तानातून निमंत्रण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानातून निमंत्रण, काय आहे कारण?
PM Modi-Shehbaz Sharif
| Updated on: Aug 30, 2024 | 5:59 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आले तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधांनाना शपथविधीसाठी आमंत्रण दिले होते. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानात जात नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. मोदींकडून संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरु असतानाचा पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून भारतात मोठे हल्ले झाले. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध इतके बिघडले की आता दोन्ही देशांमधील व्यापार देखील बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पाकिस्तानातून आमंत्रण आले आहे.

पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ‘डॉन’ वृत्तपत्राच्या बातमीनुसार, पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, १५-१६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सरकार प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

पीएम मोदींना निमंत्रण

“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.” बलोच म्हणाले की, काही देशांनी एससीओ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट समिटमध्ये त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. “कोणत्या देशाने पुष्टी केली आहे हे योग्य वेळी कळेल,” पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचा दीर्घ इतिहास आहे, मुख्यत्वे काश्मीरचा प्रश्न आणि पाकिस्तानकडून होणारा सीमापार दहशतवाद यामुळे दोन्ही देशांमधील वाद कायम आहे.

पाकिस्तानबाबत भारताचे धोरण काय?

पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवेत असे भारत म्हणत आहे. मात्र, अशा संबंधांसाठी दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे, असे देखील भारताने म्हटले आहे. SCO शिखर परिषदेच्या आधी SCO सदस्य देशांमधील आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि मानवतावादी सहकार्यावर लक्ष केंद्रित करून मंत्रीस्तरीय चर्चा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांच्या अनेक फेऱ्या असतील.

SCO हा भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा प्रभावशाली आर्थिक आणि सुरक्षा गट आहे. भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारले असता प्रवक्त्याने सांगितले की, “पाकिस्तान आणि भारतामध्ये कोणताही थेट द्विपक्षीय व्यापार नाही.” भारतीय संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे संबंध कमी केले आहेत.