
इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी पेटले आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. त्यामुळे इराणने बदला घेण्याची घोषणा केली होती. मात्र इराण नेमका कसा बदला घेणार? इराण थेट अमेरिकेवर हल्ला करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता इराणने कसा बदला घेणार याचे संकेत दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने बदल्याचे संकेत दिले आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील एका प्रस्तावावरील चर्चेदरम्यान इराणी राजदूत अमीर इरावनी यांनी असं म्हटलं की ‘आम्ही वेळ आल्यानंतर निश्चितच बदला घेणार आहोत.’ इरावनी यांनी जशास तसं उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच, अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे जितके नुकसान केले आहे तितकेच इराण अमेरिकेचे नुकसान करणार आहे.
इराण 3 ठिकाणांवर हल्ला करणार ?
इराणी राजदूत अमीर इरावनी यांनी बदला घेण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने बी-2 बॉम्बरद्वारे इराणचे नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान अणु तळ उद्ध्वस्त केले होते. इराणने या 3 ठिकाणी युरेनियम गोळा करून साठवले होते. इराण युरेनियमद्वारे अणुबॉम्ब बनवण्याची तयारी करत होता. मात्र अमेरिकेने इराणची योजना हाणून पाडली. त्यामुळे आता इराण अमेरिकेची फक्त 3 ठिकाणे नष्ट करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
19 आखाती देशांमध्ये अमेरिकेचे तळ
समोर आलेल्या माहितीनुसार 19 आखाती देशांमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. अमेरिकेने सीरिया, कतारसारख्या देशांमध्ये मोठे तळ बांधलेले आहेत. मध्य पूर्वेत 50 हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. मात्र आता इराणवर हल्ला केल्याने अमेरिकेच्या या तळांना धोका वाढला आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या मते इराणच्या निशाण्यावर तुर्की, सीरिया, कतार, सौदी, जॉर्डनचे तळ आहेत. यातील काही तळांवर इराण हल्ला करण्याची शक्यता आहे.
रशियाची भूमिका महत्वाची
इराण आता रशियाच्या पाठिंब्याची वाट पाहत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली आहे. यावेळी पुतिन यांनी अमेरिकेचा हल्ला चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुतिन आपल्याला मदत करतील अशी आशा इराणला आहे. इराणला रशियाकडून शस्त्रे आणि अणुपुरवठा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रशियाने पाठिंबा दिला तर इराण अमेरिकन तळांवर हल्ला करण्याची शक्यता आहे.