खामेनींच्या ‘या’ एका चुकीचा इराणला फटका, …तर इस्रायलने हल्लाच केला नसता, पुतीन यांचा मोठा खुलासा

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी इराणबाबत मोठा खुलासा केला आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

खामेनींच्या या एका चुकीचा इराणला फटका, ...तर इस्रायलने हल्लाच केला नसता, पुतीन यांचा मोठा खुलासा
| Updated on: Jun 20, 2025 | 9:25 PM

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मिसाईल हल्ला करण्यात येत आहे. अशातच आता या युद्धावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी इराणबाबत मोठा खुलासा केला आहे. पुतीन म्हणाले की, इराणने रशियाची संरक्षण प्रणाली खरेदी केली असती तर इस्रायल तेहरानवर हल्ला करू शकला नसता.

बीबीसी पर्शियनच्या वृत्तानुसार, पुतीन यांनी या युद्धासाठी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना जबाबदार धरले आहे. पुतीन म्हणाले की, ‘मी काही वर्षांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना ही ऑफर दिली होती, परंतु ते त्यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. इराणने रशियाची संरक्षण प्रणाली खरेदी केली असती तर इस्रायलने तेहरानवर हल्ला केला नसता आणि युद्ध सुरु झाले नसते.’ पुतीन एस-400 संरक्षण प्रणालीबाबत बोलत होते रशियाने 2016 मध्ये खामेनींच्या सरकारला ही ऑफर दिली होती, मात्र इराणने ती नाकारली होती.

पुतीन आणखी काय म्हणाले?

पुतीन पुढे बोलताना म्हणाले की, ‘इराणने अद्याप रशियाकडून कोणतीही मदत मागितली नाही, जोपर्यंत इराणकडून कोणताही प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर बोलू शकत नाही. तसेच आमच्यामध्ये असा कोणताही करार नाही ज्या अंतर्गत हल्ला झाल्यास आम्ही इराणला लष्करी मदत करु शकू.’

इराणमध्ये 600 लोकांचा मृत्यू

इराणची राजधानी तेहरानवर हल्ला करणे हे इस्रायलचे सर्वात मोठे टार्गेट आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणमधील 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणचे 10 पेक्षा जास्त लष्करी कमांडर आणि 9 अणुशास्त्रज्ञही मारले गेले आहेत. इस्रायल ड्रोन-क्षेपणास्त्रांद्वारे इराणवर हल्ला करत आहे. याला इराण देखील प्रत्युत्तर देत आहे.

एस-400 कसे काम करते?

रशियाची एस-400 ही एक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे, जी 2007 मध्ये रशियन सैन्यात सामील करण्यात आली होती. ही प्रणाली 400 किमी अंतरावरून शत्रूची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करु शकते. एस-400 ही एक मल्टी-ट्रॅकिंग क्षमता, उच्च-श्रेणीची क्षेपणास्त्रे असलेली संरक्षण प्रणाली आहे. रशिया स्वतः ही प्रणाली वापरते, शिवाय इतर देशांना देखील विकते. याच्या एका युनिटची किंमत 1.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 780 कोटी रुपये) आहे.