
Iran-Israel Ceasefire News : इराण आणि इस्त्रायल या दोन देशातील 12 दिवसांपासूनचे युद्ध थांबल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या माहितीनुसार, इराण आणि इस्त्रायल या दोन देशांदरम्यान युद्धविराम हा मध्यपूर्वेतील शांततेसाठी ऐतिहासिक पाऊल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही देशात युद्धविरामावर सहमती झाली आहे. अमेरिका आणि कतर या दोन्ही देशांनी त्यासाठी मोठी भूमिका निभावल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तर दुसरीकडे इराणने कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हल्ले चढवले आहेत. एकूण 10 मिसाईल डागल्या. या युद्धतळावरील सैनिक, फायटर विमानं आणि इतर युद्ध सामग्री हलवल्याने कोणतेच नुकसान झाले नाही असा दावा अमेरिकेने केला आहे. तर कतारवर आमचा हल्ला करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, आम्ही अमेरिकन बेसवर हल्ला केल्याची भूमिका इराणने जाहीर केली आहे. त्यामुळे या युद्धविरामवर प्रश्नचिन्ह आहेत. हा युद्धविराम झाला तरी कसा असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
युद्धविरामावर सहमती तरी कशी?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहितीनुसार, तीन मुद्यांआधारे दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करण्यात आला. दोन्ही देशांनी सैन्य, लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शवली. इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अरागची यांनी मात्र अद्याप कोणताही औपचारिक करार झाला नसल्याचा दावा केला आहे. जर इस्त्रायल तेहरानवरील हल्ले थांबवत असेल तर इराण सुद्धा प्रतिहल्ले चढवणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे कोणते ते तीन मुद्दे
पहिला मुद्दा : दोन्ही देश त्यांची अंतिम सैन्य कारवाई पूर्ण करतील. या लष्करी कारवाईनंतर इराण पहिल्या 12 तासात युद्धविरामाची भूमिका घेईल. इराण पहिल्यांदा युद्धविराम करेल.
दूसरा मुद्दा : जेव्हा इराण 12 तास युद्धविराम करेल. त्यानंतर इस्त्रायल पुढील भूमिका घेईल. इराणनंतर इस्त्रायल पुढील 12 तास कोणताही हल्ला करणार नाही. करारानुसार, इस्त्रायल इराणवर हल्ला करणार नाही.
तिसरा मुद्दा : इराणकडून 12 तास आणि पुढे इस्त्रायलकडून 12 तास असे 24 तास कोणतेही युद्ध होणार नाही. दोन्ही देश एकमेकांवर या काळात हल्ला करणार नाहीत. 24 तासानंतर दोन्ही देशातील युद्ध संपेल. त्यानंतर अधिकृतपणे युद्ध संपल्याची घोषणा करण्यात येईल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
कतार देशाची भूमिका महत्त्वाची
सूत्रांच्या माहितीनुसार, इराण आणि इस्त्रायल या दोन देशांमध्ये शांतता आणण्यासाठी कतारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी आणि अमेरिकी उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी इराणसोबत चर्चा केली. कतारने इराणला शांतता करारासाठी तयार केले. दुसरीकडे इस्त्रायल आता कोणतेही हल्ले करणार नाही असे आश्वासन ट्रम्प यांनी इराण दिले. त्यानंतर आता दोन्ही देश कोणती भूमिका घेतात हे लवकरच समोर येईल.