Iran-Isreal War : युद्धादरम्यान इराणचं टेन्शन वाढलं, सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? एक पायही…

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल अनेक दावे समोर येत आहेत. वडील आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर ते जखमी झाल्याच्या बातम्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मते ते गंभीर जखमी असले तरी जिवंत आहेत. सार्वजनिकरित्या समोर न आल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अटकळींना वेग आला आहे, ज्यामुळे इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षावर अनिश्चितता वाढली आहे.

Iran-Isreal War : युद्धादरम्यान इराणचं टेन्शन वाढलं, सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? एक पायही...
सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई
| Updated on: Mar 13, 2026 | 9:38 AM

इराण-अमेरिका- इस्रायलच्या युद्धाला 14 दिवस उलटले असून दिवसेंदिवस हा संघर्ष वाढतच चालला आहे. त्याचा जगावरही मोठा परिणाम होत आहे, मात्र कोणताच देश माघार घ्यायला तयार नाहीये. याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल. युद्ध सुरू झाल्यावर अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई हे ठार झाले. त्यांच्या मृत्यूने इराणमध्ये अनेकांना मोठा धक्का बसला, इराण आणखी चवताळला आणि हा संघर्ष तीव्र झाला. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची निवड इराणचे सर्वोच्च नेते म्हणून करण्यात आली. मात्र आता त्यांच्यासंदर्भातच मोठी माहिती समोर आली आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते नेते मोजतबा खामेनेई हे जखमी झाले होते, त्यांच्याच प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल अनेक दावे करण्यात येत आहेत. त्याचदरम्यान दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांचा दावा आहे की मोजतबा खामेनेई अजूनही जिवंत आहेत, परंतु ते गंभीर जखमी असू शकतात. फॉक्स न्यूज रेडिओला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली. ‘मला वाटतं ते जिवंत आहेत. मला वाटतं मोजतबा यांना खूप लागलं आहे, पण ते जिवंत आहेत असं वाटतंय’ असं ट्रम्प यांनी नमूद केलं. इराणचे सर्वोच्च नेते झाल्यावर गुरुवारी, खामेनेई यांनी त्यांचं पहिलं भाषण दिलं. काही तासांनंतर, एका वृत्तात असा दावा करण्यात आला की इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याचा एक पाय गेला आहे, यकृत खराब झाले आहे आणि ते कोमात असू शकतात. त्यामुळे मोठी खळबळ माजली.

मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल का व्यक्त होत आहेत अटकळ ?

इराणचे नवे सर्वोच्च नेते झाल्यानंतर गुरुवारी, मोजतबा खामेनेई यांनी त्यांचं पहिले अधिकृत विधान जारी केले. हे विधान इराणच्या सरकारी टीव्हीवर प्रसारित करण्यात आले, परंतु खामेनेई हे स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. त्यांचे विधान एका वृत्तवाहिनीने वाचून दाखवले. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अटकळींना वेग आला आहे. त्यांचे वडील, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोजतबा खमेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्याच हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील इतर अनेक सदस्यह मृत्यूमुखी पडले होते.

काल, सरकारी टीव्हीवर वाचण्यात आलेल्या त्यांच्या पहिल्या संदेशात, 56 वर्षीय खामेनेई यांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध कडक भूमिका घेतली. इराण “त्याच्या शहीदांच्या रक्ताचा” बदला घेईल.होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील आणि आखाती देशांनी त्यांच्या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळ त्वरित नष्ट करावेत असा इशाराही त्यांनी दिला. जर अमेरिकेचे लष्करी तळ बंद केले नाहीत तर त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असंही खामेनेई म्हणाले. इराण आपल्या ( आयातुल्ला अली खामेनेई) वडिलांच्या धोरणांनुसारच चालवक राहील आणि अमेरिका आणि इस्रायलविरुद्धचा संघर्ष सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केले.

मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट्स ?

मात्र, खामेनेई हे स्वत: कॅमेऱ्यासमोर आल्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. यापूर्वी, अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला होता की पहिल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यातही ते जखमी झाले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात खमेनी यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र CNN ने असा दावा केला होता की त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, डोळ्यांजवळ दुखापत झाली आणि चेहऱ्यालाही लागलं. पण “द सन” या ब्रिटिश वृत्तपत्रामधील एका वृत्तात आणखी गंभीर दावा करण्यात आला आहे. वृत्तानुसार, खामेनी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते आणि कोमात गेले. एवढंच नव्हे तर त्यांचा एक पाय कापावा लागला होता आणि त्यांच्या यकृताला किंवा पोटालाही गंभीर नुकसान झाले होते असा दावाही त्यात करण्यात आला होता.

तेहरानच्या ऐतिहासिक जिल्ह्यात असलेल्या सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कडक सुरक्षेत उपचार सुरू असल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रुग्णालयाचा एक भाग पूर्णपणे सील करण्यात आला असून आणि कडक सुरक्षा तैनात करण्यात आल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं.

Follow Us