Israel Attack Iran : अणूउर्जा प्रकल्प उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र केंद्र नष्ट, शास्त्रज्ञ-कमांडर ठार…इस्त्रायलने इराणवर का केला इतका भीषण हल्ला?

Israel Attack Iran : दशकापासून इराणचे हुकुमशाह इस्त्रायलच्या विनाशाची भाषा करत होते. त्यासाठी अण्वस्त्र कार्यक्रम हाती घेतला होता. अणू बॉम्ब बनवण्यासाठी उच्च-संवर्धित यूरेनियमचे उत्पादन केले. यामुळे इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्याचे बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले.

Israel Attack Iran : अणूउर्जा प्रकल्प उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र केंद्र नष्ट, शास्त्रज्ञ-कमांडर ठार...इस्त्रायलने इराणवर का केला इतका भीषण हल्ला?
israel attack iran
| Updated on: Jun 13, 2025 | 10:50 AM

इस्त्रायलने इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणचा अणूउर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झाला आहे. क्षेपणास्त्र तयार होणारी साईट नष्ट केली आहे. इराणच्या दोन शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. तसेच सैन्य प्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी यांचाही मृत्यू झाला आहे. इस्त्रायलने ऑपरेशन रायजिंग लॉयन असे नाव या ऑपरेशनला दिले आहे. दरम्यान, इराणने इस्त्रायलच्या हल्ल्यात त्यांचा नतांज अणूप्रकल्प नष्ट झाल्याचे मान्य केले आहे. या प्रकल्पात इराण यूरेनियम संवर्धन करत होता. यूरेनियम संवर्धन करुन अणूबॉम्ब बनवण्याचा इराणचा प्रयत्न होता.

इस्त्रायलने का केला भीषण हल्ला?

इस्त्रायलने इराणवर इतका भीषण हल्ला का केला? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हा हल्ला इतका भीषण आहे की, इस्त्रायल-इराण युद्ध आउट ऑफ कंट्रोल जाण्याची शक्यता आहे. यामुळे इस्त्रायलने इतका मोठा, घातक आणि प्रचंड हानी करणारा हल्ला का केला, असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचे उत्तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका व्हिडिओमधून दिले आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, दशकापासून इराणचे हुकुमशाह इस्त्रायलच्या विनाशाची भाषा करत होते. त्यासाठी अण्वस्त्र कार्यक्रम हाती घेतला होता. अणू बॉम्ब बनवण्यासाठी उच्च-संवर्धित यूरेनियमचे उत्पादन केले. आम्ही इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ला केला. इराणसाठी अणूबॉम्ब बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना लक्ष्य केले. आम्ही इराणच्या बॅलिस्टीक क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रावरही हल्ला केला.

इराणने अणूबॉम्ब बनवला तर इस्त्रायलचे अस्तित्वच नष्ट करेल, अशी भीती इस्त्रायलला वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही किंमतीत इराणला अणूबॉम्ब बनवू न देण्याचा इस्त्रायलचा प्रयत्न होता. अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराण अणूबॉम्ब बनवू शकत नाही, असे म्हटले होते. अमेरिका इराणला अणूबॉम्ब बनवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु इराण आपल्या सुरक्षेचा दावा करत अण्वस्त्र कार्यक्रम राबवत होता. त्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलचा इराणसोबत तणाव निर्माण झाला होता. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी अमेरिका किंवा इस्त्रायल आमचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखू शकणार नाही, असे म्हटले होते.