
इस्रायल हा भारताचा सच्चा मित्र आहे. 1999 सालच कारगिल युद्ध असो किंवा आताच ऑपरेशन सिंदूर इस्रायलने नेहमीच भारताला मदत केली आहे. भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यातही इस्रायल कधी मागे-पुढे पाहत नाही. इस्रायलसोबत भारताचे रणनितीक, संरक्षण सहकार्य करार आहेत. पण आता इस्रायलच्या अतातयीपणाच्या एका निर्णयामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्रायलने मागच्या आठवड्यात कतरची राजधानी दोहामध्ये हल्ला केला. हमास नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने हा एअर स्ट्राइक केला. इस्रायलला या कारवाईत यश मिळालं नाही. याचा उलटा परिणाम झाला. कतरने आपल्या देशात मुस्लिम देशांची एक मोठी परिषद भरवली. 55 पेक्षा जास्त देश या परिषदेला हजर होते. सगळ्यांनी मिळून इस्रायलच निषेध केला.
पण याच दरम्यान पाकिस्तान सौदी अरेबियामध्ये एक करार झाला. स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट (SMDA) असं या कराराच नाव आहे. या कराराची सगळीकडे चर्चा आहे. कारण पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेला हा करार नाटो देशांसारखा आहे. म्हणजे एकादेशावरील हल्ला दोन देशांवरील हल्ला मानून प्रत्युत्तर दिलं जाईल. म्हणजे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास तो सौदीवरील हल्ला मानला जाईल. आतापर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये चार युद्ध झाली आहेत. पुढच्या काही वर्षात दोन्ही देशात मोठं काहीतरी घडू शकतं. याची शक्यता नाकारता येत नाही. कतरवर इस्रायली हल्ल्यानंतर सौदीने लगेच पाकिस्तानसोबत हा करार केला.
यात भारताच्या डोक्याचा ताप वाढणार
भारताचे सौदी अरेबियासोबत चांगले संबंध आहेत. उद्या ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती उदभवल्यास भारताचे सौदी सोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. सौदीने पाकिस्तानसोबत असा करार केल्यामुळे उद्या पाकिस्तानला सौदीची शस्त्रास्त्र वापरता येतील. त्यांच्याकडून पैसा घेऊन सुरक्षेच्या नावाखाली नवीन शस्त्रास्त्रांच्या संशोधनावर खर्च करता येईल. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब आहे, त्यामुळे त्यांना हे शक्य नाहीय. पण आता या कराराचा सौदीपेक्षा पाकिस्तानला जास्त फायदा आहे. यात भारताच्या डोक्याचा ताप वाढणार आहे.
त्यांना वेगळे मार्ग अवलंबता आले असते
मूळात आखातामधील सौदी अरेबिया, ओमान, कतर UAE हे असे देश आहेत, जे युद्धाच्या फंदात पडत नाही. आर्थिक विकास, पैसा, गुंतवणूक याकडे त्यांचा कल असतो. पाकिस्तानसारखे दहशतवादी हे देश पोसत नाहीत. त्यामुळे इस्रायलला या देशांकडून तसा थेट धोका नव्हता. हमासच्या लीडरना मारण्यासाठी त्यांना वेगळे मार्ग अवलंबता आले असते, थेट कतरमध्ये घुसून हल्ला करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आज भारताच्या अडचणी आणि आव्हानं वाढली आहेत.