मोठी बातमी! इस्रायलचा आणखी एका देशात हल्ला, पुन्हा युद्ध पेटणार?

आज (रविवार) सकाळी इस्रायली सैन्याने हौथी बंडखोरांविरोधात कारवाई करत येमेनची राजधानी साना येथे अनेक शक्तिशाली हल्ले केले.

मोठी बातमी! इस्रायलचा आणखी एका देशात हल्ला, पुन्हा युद्ध पेटणार?
israel yemen
| Updated on: Aug 17, 2025 | 3:07 PM

जगभरात गेल्या काही काळापासून अशांतता आहे. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर आता इस्रायलने येमेनमध्ये हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायल आणि हौथी बंडखोर यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून हल्ले सुरू आहेत. इस्रायलीच्या हल्ल्यांमुळे हिजबुल्लाह आणि हमासने हल्ले थांबवले आहेत, मात्र हौथी बंडखोर अजूनही सक्रीय आहेत.

आज (रविवार) सकाळी इस्रायली सैन्याने हौथी बंडखोरांविरोधात कारवाई करत येमेनची राजधानी साना येथे अनेक शक्तिशाली हल्ले केले. हे हल्ले सानाच्या दक्षिणेस असलेल्या हाझिझ पॉवर स्टेशनजवळ करण्यात आले. या पॉवर स्टेशनमधून सामाला वीज पुरवठा केला जातो. या हल्ल्यात स्टेशनच्या जनरेटरचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

इस्रायलकडून पायाभूत सुविधांवर हल्ले

इस्रायलच्या या हल्ल्यानंतर हौथी राजकीय ब्युरोचे सदस्य हाझेम अल-असद यांनी म्हटले की, इस्रायल आमच्या देशातील पायाभूत सेवा सुविधांवर हल्ला करत आहे. हे हल्ले जाणूनबुजून केले जात आहेत. इस्रायल आपल्या हल्ल्यांमध्ये येमेनी नागरिकांनाही लक्ष्य करत आहे असंही हाझेम अल-असद यांनी म्हटले.

गाझाच्या समर्थनार्थ हल्ला

येमेन गाझावरील इस्रायली कारवाईला विरोध करत आहे, येमेनकडून लाल समुद्र आणि अरबी समुद्रात इस्रायली जहाजांना टार्गेट करण्यात येत आहे. येमेनी सशस्त्र दलाने सांगितले आहे की, गाझावरील इस्रायली आक्रमण थांबेपर्यंत आणि वेढा उठेपर्यंत हे ऑपरेशन सुरू राहतील. त्यामुळेच आता इस्रायलने हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याआधी इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटनने हौथी बंडखोरांवर हल्ले केले आहेत. ज्यात हौथी तळ तसेच नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते. यात महिला आणि मुलांसह काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा हल्ला झाल्याने येमेन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येमेनी सैन्या आता इस्रायली जहाजांविरोधात आणखी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.