इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, धग भारतापर्यंत, नेमकी चिंता का वाढली?

इस्रायलने इराणला कमकुवत करण्यासाठी जगातील सर्वांत मोठ्या नैसर्गिक वायू निर्मितीच्या ठिकणावर हल्ला केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची आता चिंता वाढली आहे.

इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, धग भारतापर्यंत, नेमकी चिंता का वाढली?
benjamin netanyahu and narendra modi and Ayatollah Khamenei
| Updated on: Jun 15, 2025 | 7:17 PM

इस्रायल आणि इराण युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र, बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून मोठे हल्ले करत आहेत. दोन्ही देशांतील युद्धामुळे मात्र संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. युद्धभूमीवरून एक मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डला उद्ध्वस्त करून टाकलंय. इस्रायलच्या या कृतीमुळे संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे.

अनेक देशांना पुरवला जातो नैसर्गिक वायू

इराणमधील साऊथ पार्स गॅस फिल्डमध्ये गॅसनिर्मिती केली जाते. इस्रायलच्या हल्ल्याचं हे ठिकाण जगातील गॅसनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांमध्ये सर्वाधिक मोठे ठिकाण आहे. याच ठिकाणाहून जगातील अनेक देशांना नैसर्गिक वायू पुरवला जातो.

भारतावर पडू शकतो परिणाम

इस्रायलने इराणच्या ज्या ठिकाणावर हल्ला केला आहे, त्या ठिकाणावर कतारचा मोठा वावर असतो. कतारमध्ये या ठिकाणाला नॉर्थ फिल्ड असं म्हटलं जातं. सद्यस्थितीला भारत या ठिकाणाहून नैसर्गिक वायूची खरेदी करत नाही. पण इस्रायलच्या या हल्ल्याचा काहीसा परिणाम भारतातील नैसर्गिक पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतावर नेमका काय परिणाम पडण्याची शक्यता?

साऊथ पार्स गॅस फिल्डमध्ये नैसर्गिक वायूला एलएनजी म्हणजेच लिक्विड नॅच्यूरल गॅसमध्ये रुपांतरीत केले जाते आणि त्यानंतर हा एलएनजी इतर देशांना पुरवला जातो. या खरेदीममध्ये कतार हा देश प्रमुख देशांपैकी एक आहे. भारत इराणच्या या ठिकाणाहून थेट नैसर्गिक वायू खरेदी करत नाही. मात्र कतारकडून एलएनजीची भारत खरेदी करतो. त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्यात साऊथ पार्स गॅस फिल्डला हानी पोहोचली असेल तर भारताला मिळणाऱ्या एलएनजीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राबवले जातेय ऑपरेशन रायझिंग लायन

दरम्यान, इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन रायझिंग लायन ही मोहीम चालू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रायल हमासला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. तर प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.