
Israel Attack on Gaza City : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. या दोघांमधील युद्ध दिवसेंदिवस विक्राळ रुप धारण करत आहे. हे युद्ध थांबावे यासाठी ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. या तिन्ही देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. दरम्यान, या मोठ्या घोषणेआधी इस्रायलने गाझामध्ये मोठा हल्ला केला आहे. आता या हल्ल्यामुळे हमास आणि इस्राल यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या सैन्याने गाझावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्याबाबत गाझा सिटीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी (21 सप्टेंबर) या हल्ल्याबाबत माहिती दिली. इस्रायलकडून शनिवारी (20 सप्टेंबर) रात्रभर गाझा शहरावर हल्ले करण्यात आले आहेत. यात एकूण 34 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रुग्णालय कर्मचारी, त्याची पत्नी आणि त्याच्या तीन मुलांचा समावेश आहे. गाझा शहराच्या दक्षिण भागात रहिवासी इमारतीवरही इस्रायलने हल्ला केला आहे. यात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने गाझावर आपले हल्ले तीव्र केले आहेत. गाझा सिटीतून पॅलेस्टाईनी लोकांना हाकलून देण्यासाठी इस्रायले ही मोहीम हाती घेतली आहे. इस्रायलच्या आक्रमक धोरणामुळे आता तिथे लाखो लोकांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. युद्ध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांचा अभ्यास असणाऱ्यांनी इस्रालयच्या या धोरणामुळे भूक, मानवी संकट वाढू शकते, असे सांगितले आहे. इस्रायलने मात्र शनिवारी केलेल्या या हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, इस्रायल-हमास यांच्यात 2023 सालापासून युद्ध चालू आहे. ऑक्टोबर 2023 पासून इस्रायल गाझा पट्टीत हल्ले करत आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच हमासने 250 लोकांना बंदी बनवलं होतं. त्यानंतर इस्रायलच्या सैन्याने आक्रमक पवित्रा धारण करत गाझा पट्टीवर बॉम्बगोळे फेकले होते. तेव्हापासून हे युद्ध अजूनही चालूच आहे. असे असताना इस्रायलने केलेल्या या हल्ल्याला हमास नेमके कसे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.