खूनी कोंबडा, या कोंबड्याने असं काही केलं की एका बुजुर्गाचा जीवच गेला; वर्षभर चौकशी चालली पण कुणाची?

| Updated on: Feb 24, 2023 | 11:12 AM

कोंबड्याने माणसाचा जीव घेतल्याची ही पहिलीच घटना असल्याने चौकशी यंत्रणांना संशय बळावला. त्यामुळे जॅस्पर यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं. त्यात गंभीर कोरोनरी अथेरोमा आणि कार्डियाक मेगालीमुळे त्यांना कार्डियाक अरेस्ट आला.

खूनी कोंबडा, या कोंबड्याने असं काही केलं की एका बुजुर्गाचा जीवच गेला; वर्षभर चौकशी चालली पण कुणाची?
rooster
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डुब्लिन : जीवन हे क्षणभंगूर आहे. कुणाचा मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही. फक्त निमित्त होतं आणि चालताबोलता माणूस आयुष्यातून उठतो. आता हेच पाहा ना… एका बुजुर्ग व्यक्तीवर कोंबड्याने हल्ला केला. या कोंबड्याच्या खुनी हलल्यात या बुजुर्ग व्यक्तीचा मृत्यू झाला. तब्बल वर्षभर या प्रकरणाची चौकशी झाली. चौकशी अंती कोंबड्याच्या हल्ल्यातच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. या धक्कादायक अहवालामुळे आणि या घटनेमुळे सदर व्यक्तीचे कुटुंबीय आणि परिसरातील लोक कोंबड्यामुळे चांगलेच हादरून गेले आहेत.

आयर्लंडच्या किलहोर्निया भागात ही घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव जॅस्पर क्रॉस असं आहे. ते मूळचे नेदरलँडचे रहिवासी आहेत. घरातील किचनमध्ये त्यांच्यावर हा हल्ला झाला. ही घटना 28 एप्रिल 2022ची आहे. मात्र, ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आयरिश चौकशी समितीने या प्रकरणाचा रिपोर्ट दिला आहे. न्यायालयीन चौकशीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

हल्ल्यानंतर किंचाळत होते

चौकशी अहवालानुसार जॅस्पर यांच्यावर ब्राहमा चिकन (कोंबडा)ने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जॅस्पर जोरजोरात ओरडत होते. ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या शरीरातून सुरू असलेला रक्तस्त्राव काही थांबण्याचं नाव घेत नव्हता, असं त्यांचे शेजारी कोरी ओ कीफ यांनी सांगितलं. कोंबड्याचा कृत्य पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. आम्ही तात्काळ एमर्जन्सी नंबरवरून फोन केला. त्या दरम्यान मी जॅस्पर यांच्या जखमांवर औषध लावलं. त्यांना 25 मिनिटे सीपीआर दिलं. त्यानंतर 25 मिनिटानंतर रुग्णावाहिका आली, असं कोरी यांनी सांगितलं.

एकच शब्द उच्चारला…

या हल्ल्यानंतर बऱ्याच वेळानंतर जॅस्पर शुद्धीवर आले. त्यावेळी त्यांनी एकच शब्द वापरला. तो म्हणजे Rooster. म्हणजे कोंबडा, असं कोरी म्हणाले. दरम्यान, जॅस्पर यांची कन्या वर्जिनिया गुइनन यांनी या हल्ल्याप्रकरणी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. ज्या दिवशी वडिलांवर कोंबड्याने हल्ला केला. त्या दिवशी मी दुकानातून स्वयंपाकघरासाठी लागणारं सामान आणलं होतं. त्यावेळी घरात वडील आणि शेजारी राहणारे कोरी दोघेच होते. मी बाहेर गेले होते.

कोरी यांनी वडील रक्तबंबाळ होऊन घरात पडल्याचं सांगितलं. त्यावेळी मी घरात जाऊन पाहिलं तर घरभर रक्ताचे सडे पडले होते. वडिलांच्या जांघेतून रक्त निघत होतं. वडील निपचित पडलेले होते. त्यांना जागं करूनही ते उठले नाहीत. त्यांचा मृत्यू झाला असावा असं मला वाटलं, असं गुइननने चौकशीत स्पष्ट केलं. कोंबड्याच्या चोचीला रक्त लागलेलं होतं, असंही तिने पोलिसांना सांगितलं होतं.

हल्ल्यापूर्वी दाणे टाकले

कोरी यांच्या मतानुसार, घटनेच्या आधीच्या रात्री जॅस्पर यांनी कोंबड्याला स्वत: दाणे टाकले होते. मी नाईट ड्युटी करून सकाळी 8 वाजता घरी आलो होतो. मी जेव्हा घरात आलो तेव्हा जखमी अवस्थेत जॅस्पर किंचाळताना दिलसे. त्यानंतर मी लगेच 999 नंबर फिरवला आणि माहिती दिली. या दरम्यान मी जॅस्पर यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण ते हळूहळू बेशुद्ध पडले आणि त्यांचा जीवही गेला, असं कोरी यांनी सांगितलं.

कोंबड्याचा हल्ला, त्यानंतर हृदयविकार

कोंबड्याने माणसाचा जीव घेतल्याची ही पहिलीच घटना असल्याने चौकशी यंत्रणांना संशय बळावला. त्यामुळे जॅस्पर यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं. त्यात गंभीर कोरोनरी अथेरोमा आणि कार्डियाक मेगालीमुळे त्यांना कार्डियाक अरेस्ट आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे कोंबड्याने चोचीने गंभीर हल्ला केल्यानंतर जॅस्पर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं. जॅस्पर यांच्या जांघेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यानेही त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.