
बांगलादेशातील हिंसक आंदोलन झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना या भारतात आश्रयासाठी आल्या आहेत. त्यानंतर आज अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी चर्चेत असलेले प्रोफेसर मुहम्मद युनूस बांगलादेशात पोहोचले. गुरुवारी दुपारी पॅरिसहून ढाका विमानतळावर पोहोचल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर युनूस यांनी देशाला अराजकता आणि हिंसाचारापासून वाचवण्याचे भावनिक आवाहन केले. हजरत शाहजलाल विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर सर्वप्रथम हे सुनिश्चित करा की देशात कोठेही कोणीही कोणावर हल्ला करणार नाही आणि हिंसाचार होणार नाही. हिंसाचार थांबवणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. मला तुम्हा सर्वांकडून हे वचन हवे आहे.
प्रोफेसर युनूस यांचे विमानतळावर लष्करप्रमुख आणि विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, ‘देशाला अराजकतेपासून वाचवणे ही पहिली प्राथमिकता असेल. देशाला हिंसाचारापासून वाचवायचे आहे. बांगलादेश एक सुंदर देश असेल. देशात भरपूर क्षमता आहे. देशासाठी पुन्हा एकजुटीने उभा राहायचे आहे.
युनूस यांनी सरकार बदलण्यासाठी केलेल्या चळवळीचे नेतृत्व केल्याबद्दल तरुण आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बांगलादेशचा हा दुसरा ‘विजय दिवस’ असल्याचं त्यांनी म्हटले. युनूस म्हणाले की, विद्यार्थी आणि तरुणांनी आणलेले स्वातंत्र्य बांगलादेशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याशिवाय याला दुसरा विजय दिवस म्हणण्यात अर्थ नाही. अबू सईद यांना श्रद्धांजली वाहताना युनूस यांना रडू आले. अलीकडच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी अबू सईद एक होता. अश्रू रोखून युनूस म्हणाले की, ‘मला अबू सईदची खूप आठवण येत आहे. त्यांची प्रतिमा प्रत्येकाच्या हृदयात आहे. पोलिसांच्या गोळ्यांसमोर उभे राहून त्यांनी दाखवलेल्या धाडसाने देश बदलला.
शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील नवीन अंतरिम सरकारने शपथ घेतले आहे. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की, अंतरिम सरकारमध्ये सध्या १५ सदस्यांचा समावेश आहे.
नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस, जे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करणार आहेत, ते एक अर्थशास्त्रज्ञ आणि बँकर आहेत. मायक्रोक्रेडिट मार्केट विकसित केल्याबद्दल त्यांना 2006 चा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी 1983 मध्ये स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून हजारो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी ते ओळखले जातात.