Nepal Flood: आईला वाटलं मुलगा काळाने हिरावला पण…नेपाळच्या जलप्रलयात मृत्यूच्या विक्राळ दाढेतून असा बाहेर निघाला 8 वर्षांचा झोयल

Nepal Flash Flood: नेपाळच्या जलप्रलयाने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले. अनेक कुटुंब विखुरली. अनेकांची जवळची माणसं कायमची हिरावली. पण या घटनांच्या गदारोळात एका घटनेने सर्वांना सुखद धक्का दिला. मृत्यूच्या विक्राळ दाढेतून 8 वर्षांचा झोयल असा बचावला.

Nepal Flood: आईला वाटलं मुलगा काळाने हिरावला पण...नेपाळच्या जलप्रलयात मृत्यूच्या विक्राळ दाढेतून असा बाहेर निघाला 8 वर्षांचा झोयल
नेपाळ महापूर
| Updated on: Aug 29, 2026 | 8:11 AM

नेपाळमध्ये पाण्याचा रूद्रावतार दिसला. महापूराने उत्तर नेपाळातील अनेक गावं बेचिराख केली. गावंच्या गावं, पूलं, रस्ते या महापूराने गिळंकृत केली. या नैसर्गिक संकटात अनेक कुटुंब विखुरली. अनेकांनी जवळची माणसं कायमची गमावली. पण एक चमत्कार घडला. एक 8 वर्षांचा मुलगा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. महापूराने थैमान घातले तेव्हा हा मुलगा जंगलाकडे धावला. झाडावर चढून त्याने स्वतःचा जीव वाचवला. शुक्रवारी त्याच्या आईला तो जंगलात सापडला. या महापूरात आपली दोन्ही मुलं गमावल्याची भीती या माऊलीला खात होती.

भीतीने उडाली गाळण

Loading...

एक दिवसापूर्वी 8 वर्षीय झोयल याला उत्तर नेपाळचा जिल्हा रसुवा येथे जंगलातून एअरलिफ्ट करण्यात आले. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. चेहऱ्यावर अनेक घाव होते. त्याच्या 28 वर्षीय आईचे नाव तमांग आहे. ती गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही मुलांच्या शोधासाठी ती भटकत होती. बुधवारी सकाळी ही मुलं बसने शाळेत गेली होती. तर आई तमांग ही घरी कामात व्यग्र होती. तेव्हा त्यांना भूंकपासारखा आवाज ऐकू आला. महापूराचे रौद्ररुप पाहून त्या घाबरल्या. क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यांनी मुलांच्या शाळेकडे धाव घेतली. ही शाळा त्यांच्या घरापासून 20-25 मिनिटांवर होती. शाळेची इमारत पूर्णपणे उद्धवस्त झाली होती. शाळेचे ते भयान दृश्य पाहून तमांग यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली दोन्ही मुलं पूरात वाहून गेल्याच्या भीतीने या माऊलीचं काळीज हललं.

एका दिवसानंतर मुलाशी बोलली

तरीही तमांग मुलांचा शोध घेत होती. बचाव पथक दाखल होताच तिने दोन्ही मुलांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. ती सुद्धा जंगल आणि परिसरात मुलांच्या शोधात फिरली. ती वारंवार त्या शाळेच्या परिसरात मुलांचा शोध घेत होती. अखेर शुक्रवारी तमांग हिला फोन आला. तिकडून झोयल तिच्याशी बोलला. दोन्ही मुलं सुखरूप असल्याचे समजताच तमांगच्या अश्रूंचा बांध फुटला. तिला रडू कोसळले. गेल्या दोन दिवसांपासून ती वेड्यासारखी आपल्या पिलांचा शोध घेत होती. तमांग आणि तिचे सर्व कुटुंबिय या नैसर्गिक संकटातून बचावले आहेत. दोन्ही मुलं आणि इतर नातलग सुखरूप आहेत.

नेपाळच्या जलप्रलयात आतापर्यंत 587 लोकांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. तर 1900 हून अधिक जण अद्यापही बेपत्ता आहेत. या नैसर्गिक संकटातील 290 भारतीय नागरिकांचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा तपास सुरू आहे. नेपाळमध्ये बचाव कार्याला काल ब्रेक लागला होता. अजून महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज पुन्हा बचाव कार्याला वेग आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us