Netflix Layoffs : एक मेल धडकला अन् सेकंदात कर्मचाऱ्यांना नारळ, नेटफ्लिक्समधील सर्वात मोठ्या नोकरकपातीने खळबळ!
स्ट्रीमिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि अपेक्षेप्रमाणे व्यवसायाचा विस्तार होत नसल्याने नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 2022 सालानंतर ही कंपनीतील सर्वात मोठी नोकरकपात असल्याचे सांगितले जातेय.

Netflix Layoffs News : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स हा दर्जेदार मनोरंजनविषयक कन्टेंटसाठी ओळखला जातो. वेब सिरीज, चित्रपट आणि इतर मनोरंजक कार्यक्रमांचा या प्लॅटफॉर्मवर खजिना आहे. नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. परंतु या क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा प्रचंड वाढत आहे. हीच वाढती स्पर्धा आणि भविष्यातील अर्थविषयक आव्हान लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने नोकरकपातीचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. एका मेलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आलीय.
नेमका काय निर्णय झाला?
स्ट्रीमिंग क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि अपेक्षेप्रमाणे व्यवसायाचा विस्तार होत नसल्याने नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 2022 सालानंतर ही कंपनीतील सर्वात मोठी नोकरकपात असल्याचे सांगितले जातेय. द वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 6 टक्के कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. प्रोडक्ट, टेक्नॉलॉजी, कायदेशीर विभाग आणि एच आर विभागातील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारँडोस आणि ग्रेग पीटर्स यांनी ई-मेलद्वारे कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिलीय.
वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीसमोर आव्हान
नेटफ्लिक्स आपले अत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्याने नेटफ्लिक्स अन्य मार्गांनीदेखील आपली मिळकत वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. जाहिराती, लाइव्ह कार्यक्रम आणि गेमिंग क्षेत्रातही या कंपनीकडून गुंतवणूक केली जातेय. कंपनीची प्रगती म्हणावी तशी होत नसल्याने त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून येत आहे. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, कंपनीच्या शेअरमध्ये मागील सहा महिन्यांत 30 टक्क्यांपेक्षा अधिक तर वर्षभरात साधारण 40 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली होती.
अमेरिकेत सबस्क्रिप्शन प्लॅन महागला
नेटफ्लिक्सने आपले उत्त्पन्न वाढवण्यासाठी अमेरिकेत नुकतेच आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किमतीत वाढ केलेली आहे. अमेरिकेत जाहिरातींशिवाय असलेल्या स्टँडर्ड प्लॅनची किंमत दरमहा 17.99 डॉलरवरून 19.99 डॉलर करण्यात आलेली आहे. जाहिरातींसह असलेल्या प्लॅनचे शुल्क 7.99 डॉलरवरून 8.99 डॉलरपर्यंत वाढवण्यात आले. त्यानंतर आता कर्मचारी कपातीचा हा निर्णय घेण्यात आलाय.
