
दुबईमध्ये सुरू असलेल्या TV9 नेटवर्कच्या दुसऱ्या ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’मध्ये इंडिया-यूएई भागीदारी: समृद्धी आणि प्रगतीसाठी या थीमवर विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपले पाय पसरत असताना या ग्लोबल समिटमध्ये AI च्या भविष्यावर आणि त्याच्या प्रभावावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या चर्चासत्रात Accely Global चे डायरेक्टर (इनोवेशन) सत्यमित्रा मान, Ultrasafe AI चे सह-संस्थापक अर्जुन प्रसाद, इंडस्ट्रियल AI आणि डेटा विश्लेषणातील तज्ञ डॉ. अबेद बेनाइचूचे आणि BeyondSeed चे सह-संस्थापक आणि सीईओ कुलदीप मिरानी यांनी AI तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंवर आपले मत मांडले.
ग्रुप एडिटर (बिजनेस अँड इकॉनॉमी) आर श्रीधरन यांनी AI वरील चर्चेची सुरुवात करताना सांगितले की, AI हे असे तंत्रज्ञान आहे ज्यावर आपण सर्वजण खूप विचार करत आहोत. काही लोकांना AI आपल्या जीवनावर कसा परिणाम करेल हे जाणून घ्यायचे आहे, तर काहीजण नोकऱ्या टिकवण्यासाठी AI मध्ये संधी शोधत आहेत. श्रीधरन यांच्या मते, AI प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव करणार नाही, पण त्याचा परिणाम केवळ अशा लोकांवर होईल ज्यांना नोकरीत टिकून राहण्यासाठी AI चा वापर कसा करायचा, याची माहिती नाही.
काही मोठ्या गुंतवणूक बँकांचे म्हणणे आहे की, AI पुढील १० वर्षांत ३०० दशलक्ष नोकऱ्या नष्ट करेल. यावर कुलदीप मिरानी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, AI ही निश्चितपणे एक वास्तविकता आहे, परंतु मला वाटत नाही की AI थेट लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम करेल. जे लोक AI चा सराव करतात, ते AI चा सराव न करणाऱ्या लोकांकडून नोकऱ्या हिरावून घेऊ शकतात.
एक गुंतवणूकदार म्हणून AI बद्दल माझी विचारसरणी थोडी वेगळी आहे. मी AI क्रांतीवर विश्वास ठेवत नाही. कारण मला वाटते की आपण ‘AI भ्रम’ (AI illusion) मध्ये आहोत. प्रत्येक स्टार्टअप त्यांचे मूल्यांकन वाढवण्यासाठी त्यांच्या नावापुढे AI जोडण्याचा प्रयत्न करत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
AI स्वतःच एक चूक आहे. AI मॉडेल्स सातत्याने नवीन बेंचमार्क स्थापित करत आहेत, परंतु AI प्रत्यक्षात कसे आणि का कार्य करते हे कोणालाही माहिती नाही, फक्त ते कार्य करते इतकंच माहीत आहे, असे डॉ. अबेद बेनाइचूचे यांनी सांगितले.