इंटरनेट, मोबाईल बंद ठेवून पाकिस्तानचं बलुचिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन, खेळला मोठा डाव

पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमध्ये 31 ऑगस्टपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे, सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेतल्याचं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इंटरनेट, मोबाईल बंद ठेवून पाकिस्तानचं बलुचिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन, खेळला मोठा डाव
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 10:05 PM

पाकिस्तानच्या सुरक्षादलाने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या बलुचिस्तानमध्ये मोठी कारवाई केली आहे, या कारवाईमध्ये गेल्या दोन दिवसांत किमान 47 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तानच्या जनसंपर्क विभाग (आईएसपीआर) नं माहिती दिली आहे. सात ऑगस्टच्या मध्यरात्री बलुचिस्तानच्या झोब जिल्ह्यातल्या सांबाजा भागात सुरक्षादलानं केलेल्या कारवाईमध्ये 33 दहशतवादी ठार झाले आहेत, तर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये 14 दहशतवाद्यांना मारण्यात आलं. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

बलुचिस्तानमध्ये 31 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद

पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमध्ये 31 ऑगस्टपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे, सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेतल्याचं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानच्या राज्य सरकारच्या विनंतीवरून प्रांतामध्ये 31 ऑगस्टपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या संदर्भात 6 ऑगस्ट रोजी बलुचिस्तानमधील सरकारकडून एक नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं, ज्यामध्ये म्हटलं आहे की, सुरक्षेच्या कारणामुळे येत्या 31 ऑगस्टपर्यंत प्रांतामधील इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे बंद राहातील.

बंडखोर आक्रमक

दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे बलूच बंडखोर प्रचंड आक्रमक झाले आहेत. बलूच बंडखोरांकडून बलुचिस्तानमधील महत्त्वाच्या भागांमध्ये तसेच रेल्वे रुळावर हल्ले घडवून आणले जात आहेत. यापूर्वी देखील अनेकदा बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला कोला होता, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, एवढंच नाही तर चक्क एक ट्रेन देखील बलूच बंडखोरांनी हायजॅक केली होती. मात्र आता पाकिस्तानी सरकारकडून बलुचिस्तानमध्ये इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा बंद ठेवून ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 47 दहशतवादी ठार मारल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे बलूच बंडखोरांनी पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढवल्याचं देखील पाहायला मिळत आहे. बलूच बंडखोरांकडून प्रांतामध्ये हल्ले सुरूच आहेत. तर दुसरीकडे आता पाकिस्तानकडून दहशतवाद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे सध्या बलुचिस्तान प्रचंड अशांत बनला आहे.