भारतीय सैन्याला फ्रि हँड मिळताच झोप उडाली… पाकिस्तानात सध्या काय काय घडतंय? जाणून घ्या A टू Z

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बैठकांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. भारताने सैन्याला मुक्त हात दिला असून पाकिस्ताननेही युद्धाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तान पीओकेवर आणि सीमेवर सैन्य तैनात करत आहे. सिंधू जल कराराचे स्थगितीकरण आणि दारूगोळ्याचा तुटवडाही पाकिस्तानला चिंतेत टाकणारे घटक आहेत.

भारतीय सैन्याला फ्रि हँड मिळताच झोप उडाली... पाकिस्तानात सध्या काय काय घडतंय? जाणून घ्या A टू Z
फाईल फोटो
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2025 | 1:41 PM

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी फायनल अॅक्शन घेतली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकूण चार बैठकांना संबोधित करणार आहेत. त्यातच अंतिम निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यातच कालच मोदींनी भारतीय सैन्याला फ्रि हँड दिला आहे. त्याशिवाय पहलगामच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा सुनावणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती वाटत असल्यानेच पाकिस्ताननेही युद्धाची तयारी सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला फ्रि हँड दिला आहे. याचा अर्थ गुन्हेगारांना भारत धडा शिकवणार असल्याचं स्पष्ट आहे. गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई होणार हे उघड आहे. हा हल्ला उरी किंवा बालकोटसारखा असणार नाही. कारण अशा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान तयार आहे. आताची कारवाई वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पण ती कारवाई कशी असेल हे सांगता येत नाही. जेव्हा कारवाई होईल, तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. पाकिस्तानही ही गोष्ट जाणून आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पाकिस्ताकडूनही पुरेपुर खबरदारी घेतली जात आहे. पाकिस्ताननेही त्यांच्या सीमांवर जमावजमव सुरू केली आहे.

पाकिस्तानची तयारी काय?

  • अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानच्या दोन कोर तैनात आहेत. आता या सैनिकांना पीओकेवर तैनात केलं जात आहे. भारताकडून पीओकेबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. पीओके हा अभेद्य किल्ला राहावा म्हणून पाकिस्तानकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.
  • पाक हवाई दलाचे विमान सातत्याने पीओकेमध्ये चकरा मारत आहे. पाकिस्तानचे 16 कॉम्बॅट पेट्रोलिंग करत आहेत. हवाई दलाच्या कोणत्याही हल्ल्याला उत्तर देता यावं म्हणून पाकिस्तानची ही तयारी आहे.
  • मनात असूनही पाकिस्तान बलूचिस्तानवरील आपले सैन्य हटवू शकत नाही. बलूच लिबरेशन आर्मी त्याचा फायदा घेईल, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे काय करावं आणि काय नाही हे पाकिस्तान ठरवू शकला नाही.
  • सिंधु जल संधी करार स्थगित झाल्याने पाकिस्तान वैतागला आहे. भारत कधी पाणी सोडेल आणि कधी थांबवेल हे पाकिस्तानला माहीत नाही. भारतानेही पाण्याबाबतचा कोणताही डेटा शेअर केलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. लढाईच्या परिस्थितीत आधी त्यांचे टँक नदी किनाऱ्यावरून जायचे. पण आता त्यांना त्याचा वापर करता येत नाही. कारण कधीही पूर येण्याची भीती आहे, तशीच दुष्काळ पडण्याचीही भीती आहे.
  • गेल्या दोन वर्षापासून पाकिस्तान यूक्रेनला 155 मिलीमीटर तोफांसाठी दारूगोळा पुरवत आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानकडे केवळ आठवडाभर पुरेल एवढाच दारूगोळा उरला आहे. पाकिस्तानी सैन्याला तात्काळ दारूगोळा पुरवेल एवढा स्टॉकही पाककडे नाहीये आणि एखादी मोठी फॅक्ट्रीही नाहीये.
  • पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक काश्मिरींचं समर्थन मिळेल असं पाकिस्तानला वाटलं होतं. पण त्याच्या उलट झालं आहे. प्रत्येक ठिकाणी काश्मिरींनी पाकिस्तानच्या विरोधात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. उमर आणि फारुख अब्दुल्ला यांनीही पाकिस्तानला फटकारलं आहे. एवढंच नव्हे तर आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांनाही फारूक अब्दुल्ला यांनी सुनावलं आहे. तुमच्याकडे अणुबॉम्ब आहे, तर आमच्याकडे अणुबॉम्ब नाहीये का? असा सवालच अब्दुल्ला यांनी केला आहे.
  • या सर्व कारणांमुळे पाकिस्तानच्या सैन्याचे प्रमुख आसिम मुनीर यांच्यावर दबाव आला आहे. भारताला कारवाई करण्यापासून रोखा अशी गळ ते सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातला घालत आहेत. तर दुसरीकडे आम्ही पाकिस्तानचा बचाव करणार नाही, असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे.