पाकिस्तानचा खरा चेहरा समोर! भारतासोबतच्या व्यापारावर बंदी; वाघा बॉर्डरही बंद, नेमके काय निर्णय घेतले!

Pahalgam Terror Attack : भारताने पाकिस्तानची कायदेशीर कोंडी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तानचा खरा चेहरा समोर! भारतासोबतच्या व्यापारावर बंदी; वाघा बॉर्डरही बंद, नेमके काय निर्णय घेतले!
india and pakistan pahalgam terror attack
| Updated on: Apr 24, 2025 | 4:58 PM

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी करून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने पाकिस्तावर वेगवेगळ्या पाच मार्गाने प्रहार केला आहे. भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तानने नेमके काय निर्णय घेतले आहेत?

भारताने 23 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयांतर पाकिस्तानमध्ये आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. याच बैठकीनंतर आता पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भाराताला लागून असलेली अटारी बॉर्डर बंद केलेली आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. पाकिस्तानने तेथे असलेल्या भारताच्या राजदुतांनी 30 एप्रिलपर्यंत भारतात परतावं अशा सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानने त्यांचे हवाईक्षेत्र भारतासाठी बंद केले आहे. त्यामुळे आता भारताच्या विमानांना पाकिस्ताच्या हद्दीतून जाता येणार नाही.

भारतीयांना पाकिस्तान सोडण्याचा आदेश

पाकिस्तानने तेथे गेलेल्या भारतीय नागरिकांना त्यांचा देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीयांना पाकिस्तान सोडण्यास 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. शीख तीर्थयात्रेकरूंसाठी कोणतेही निर्बंध नसतील, असे पाकिस्तानने सांगितले आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापार बंद केले आहेत.

भारताने नेमके काय निर्णय घेतले आहेत?

भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी एकूण पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा परिणाम पाकिस्तानवर आगामी काळात पडणार आहे. भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. तसेच भारताने अटारी सीमा बंद केली आहे. SAARC Visa Exemption Scheme (SVES) या योजनेअंतर्गत व्हिसा असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.भारताने पाकिस्तानच्या सर्व लष्करविषयक सल्लागारांना भारतातून जाण्यास सांगितलं आहे. भारताने राजनैतिक अधिकारी कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानात असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयांची संख्या कमी करण्यात येणार आहे.

भारत पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करणार?

दरम्यान, पहलगाममधील हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने आता पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती इतर देशांनाही ठरवलं आहे. त्यासाठी भारताने परदेशी राजदूतांना बोलावलं आहे. एकूण 20 पेक्षा अधिक प्रतिनिधींना भारताने बोलावलं आहे. यात अमेरिका, ब्रिटन, इटली, जपान, चीन, युरोप, रशिया या देशांच्या राजदूतांचा सहभाग आहे.