तोऱ्यात अमेरिका-इराणला बोलवलं, पण हॉटेलचं बिलच दिलं नाही; पाकिस्तानच्या अजब कारनाम्याची चर्चा!
पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे सेरेना नावाचे एक पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या (AKDN) मालकीचे आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने याच हॉटेलची निवड केली होती.

Islamabad Peace Talk : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतलेला आहे. दोन्ही देशांत मध्यस्थी घडवून आणण्यासाठी हा देश अजूनही प्रयत्न करत आहेत. 11 ते 12 एप्रिल या काळात अमेरिका आणि इराण या दोन्ही देशाचे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे आले होते. या बैठकीत तब्बल 21 तास चर्चा झाली. परंतु चर्चा होऊनही त्यातून काहीही ठोस समोर आले नाही. म्हणूनच आता अमेरिकेने आक्रमक पवित्रा धारण करत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जलवाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नाकेबंदी सुरू केली आहे. दरम्यान, एकीकडे पाकिस्तानने घेतलेल्या या पुढाकाराची जगभरात चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र बैठक झालेली हॉटेल आणि या हॉटेलचे बील चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. पाकिस्तानी सरकारने या हॉटेलचे बीलच दिले नसल्याचा दावा केला जातोय.
सेरेना हॉटेलची विशेषता काय?
पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे सेरेना नावाचे एक पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या (AKDN) मालकीचे आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने याच हॉटेलची निवड केली होती. त्यानंतर हॉटेल प्रशासनाने 8 एप्रिल रोजी निवेदन जारी करत संपूर्ण हॉटेल पाच दिवसांसाठी बुक करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर या हॉटेलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली. हे हॉटेल एकूण 15 एकर परिसरात पसरलेले आहे. यात एकूण 400 पेक्षा जास्त खोल्या असल्याचे सांगितले जाते. तसेच ऑफिस कॉम्प्लेक्स, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स रुमही या हॉटेलमध्ये आहे. एकाच वेळी या हॉटेलमध्ये शेकडो पाहुणे थांबू शकतात. म्हणूनच इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाला राहण्यासाठी या हॉटेलची निवड करण्यात आली.
बिलाचं नेमकं प्रकरण काय?
या हॉटेलमध्ये इराण आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ एकूण पाच दिवस राहिले. परंतु या पाचही दिवसांचे बील पाकिस्तान सरकारने दिलेले नाही, असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर तसा दावा केला जातोय. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने हे पूर्ण बिल माफ केल्याचा दावा केला जातोय. पण दुसरीकडे आगा खान डेव्हलपमेंटचे सर्वेसर्वा प्रिंस रहीम आगा यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बिलमाफी केलेली नाही. त्यामुळे आता या हॉटेलच्या बिलाचे नेमके काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.