
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची अजूनही भीती गेलेली नाही. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते दुश्मन देशाने सीमेजवळील सुमारे ७२ अतिरेकी लाँचपॅड्सना आता सीमेवरुन दूर आतमध्ये शिफ्ट केले आहेत. दुसरीकडे सीमा सुरक्षा बल म्हणजे बीएसएफ संपूर्णपणे सज्ज असून सरकारकडून आदेश मिळतात कोणतीही कारवाई करण्यास तयार आहे.
पाकिस्तानने त्यांच्या अतिरेकी लाँचपॅड्सना कायम स्वरुपी एका जागांवर स्थिर ठेवलेले नाही. त्यांची जागा वारंवार बदलली जात आहे. सियालकोट आणि जफरवॉलच्या खोलगट भागात किमान १२ लॉन्चपॅड्स सक्रीय आहेत. तर उर्वरित ६० पाकिस्तानच्या संवेदनशील भागात काम करत आहेत. हे लॉन्चपॅड्स तेव्हाच सक्रीय होतात जेव्हा अतिरेक्यांना भारताच्या सीमेत ढकलायचे असते अशी माहिती बीएसएफचे डीआयजी विक्रम कुंवर यांनी सांगितले. DIG कुंवर यांनी हे देखील सांगितले की सीमेजवळ एकदम लागून आता कोणताही ट्रेनिंग कँप नाही. तरीही पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीकडे बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे.
आता पाकिस्तान जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT)च्या अतिरेक्यांना मिळून ट्रेनिंग देत आहे. आधी या दोन्ही संघटना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होत्या. परंतू ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी एजन्सींनी आता त्यांना एकत्रपणे प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. या मागे कोणत्याही मोहिमेस वेगाने राबवण्याचा त्यांचा उद्देश्य असावा असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे बीएसएफचे आयजी शशांक आनंद यांनी स्पष्ट केले की सीमा सुरक्षा दलाला, १९६५, १९७१, १९९९ कारगिल आणि आता ऑपरेशन सिंदूर सारख्या मोठ्या युद्धांचा अनुभव आहे आणि गरज पडल्यास शत्रूला अधिक नुकसान पोहचवण्याची त्यांची क्षमता आहे. जर सरकारने ऑपरेशन सिंदूर २.० सुरु करण्याचा आदेश दिला तर बीएसएफ संपूर्णपणे सज्ज आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तान रेंजर्स त्यांच्या चौक्या सोडून पसार झाले होते. परंतू आता दोन्हीकडून सैनिक आप-आपल्या पोस्टवर परत आले आहेत.