Pakistan Crisis : शेवटचे 3 दिवस उरलेले, डोक्यावर 29 हजार कोटींचं कर्ज, अखेर या दोन मुस्लिम देशांनी पाकिस्तानला वाचवलं
Pakistan Crisis : पाकिस्तान संकटात फसला आहे. UAE ने त्यांना दिलेलं 29 हजार कोटींचं कर्ज फेडण्यासाठी 17 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या कठीण काळात दोन मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आलेत.

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात सध्या पाकिस्तानची जास्त चर्चा सुरु आहे. कारण मागच्या आठवड्यात सीजफायरची घोषणा झाल्यानंतर मध्यस्थीची बोलणी पाकिस्तानात झाली. इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तान मध्यस्थ होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ही चर्चा झाली. पण बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. उलट आधीपेक्षा वातावरण जास्त बिघडलं. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये नाकाबंदी केली आहे. त्यामुळे तिथून एकही जहाज जाऊ शकत नाहीय. इराणकडून धमक्या दिल्या जात आहेत. या युद्धामुळे आखाती देश हैराण आहेत. कारण याचा सर्वात जास्त फटका तेलाच्या व्यापाराला बसतोय. तेल या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे.
मिडिल ईस्टमधील या युद्धात दुश्मनीचा अजून एक खेळ सुरु आहे. संयुक्त अरब अमिरात म्हणजे यूएईने पाकिस्तानला कर्ज दिलं होतं. यूएईने पाकिस्तानला हे कर्ज तातडीने फेडायला सांगितलं आहे. यात पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूप खराब स्थितीमध्ये आहे. पाकिस्तानला उलट अजून कर्जाची आवश्यकता आहे. यात यूएईने दिलेलं कर्ज परत मागितलं आहे. या कठीण काळात दोन मुस्लिम देशचं पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी पाकिस्तानला 5 अब्ज डॉलर म्हणजे 46,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानवर UAE चा इतका राग का?
आखातामध्ये सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये स्पर्धा सुरु आहे. आखातामध्ये आपणच प्रभावी आहोत हे दाखवून देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चढाओढ, कुरघोडी सुरु आहे. इथे पाकिस्तानने यूएईचा स्पर्धक असलेल्या सौदी अरेबियासोबत हातमिळवणी केली आहे. जे यूएईला अजिबात आवडलेलं नाही. यूएई आणि सौदी अरेबियाकडून येमेन तसचं हॉर्न ऑफ अफ्रीकामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धा लागली आहे. सौदी अरेबियाने येमेनमध्ये यूएई समर्थित समूह सदर्न ट्रांजिशनल काउंसिलवर (STC) हल्ले केलेत. त्यामुळे UAE ला सोमालियामधील बेसवरुन मागे हटावं लागलं. पाकिस्तानने सौदी सोबत डिफेन्स करार केला आहे. ते यूएईला अजिबात आवडलं नाही.
पाकिस्तानला किती कर्ज दिलेलं?
त्यामुळे यूएईने पाकिस्तानला दिलेलं 3.5 अब्ज डॉलरचं जवळपास 29 हजार कोटी रुपयाचं कर्ज 17 एप्रिलपर्यंत परत करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. पाकिस्तानकडे पैसा नाहीय. म्हणून आता सौदी अरेबिया आणि कतर त्यांना 5 अब्ज डॉलर म्हणजे 46,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. पाकिस्तान UAE चं कर्ज सौदी-कतरच्या पैशाने चुकवणार आहे.