‘तुम्ही पाणी बंद केले, आम्ही तुमचा श्वास रोखू…’, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची हाफिज सईदची भाषा

भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार पहलगाम हल्ल्यानंतर स्थगित केला. त्याचा उल्लेख करत पाकिस्तानी लष्करातील अधिकारी अहमद शरीफ चौधरी हाफिज सईदची भाषा बोलत आहे. भारताने आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.

तुम्ही पाणी बंद केले, आम्ही तुमचा श्वास रोखू..., पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची हाफिज सईदची भाषा
लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी
| Updated on: May 23, 2025 | 1:01 PM

दहशतवादी हाफिज सईद याची भाषा पाकिस्तान लष्करातील अधिकारीही बोलू लागले आहे. पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी लष्करातील इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी अहमद शरीफ चौधरी यांनी पाकिस्तानी विद्यापीठात भाषण देताना भारतविरोधी वक्तव्य केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक पद्धतीने कारवाई केली. भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार स्थगित केला. त्याचा उल्लेख करत अहमद शरीफ चौधरी म्हणाले, भारताने आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू. सिंधू नदीवरील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार आणि सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाणी वाटप आणि व्यवस्थापनाच्या अटींशी संबंधित आहे. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमित माहितीची देवाणघेवाण करणे देखील बंधनकारक आहे. या करारात जागतिक बँक मध्यस्थ म्हणून सहभागी आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानला दहशतवादी कारवाया थांबवण्याचे अनेक वेळा सांगितले आहे. रक्त आणि पाणी एका वेळी वाहू शकत नाही, असे भारताने म्हटले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी पाकिस्तानविरोधात अनेक पाऊले उचलली. त्यात सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. तसेच अटारी सीमेवरील चेक पोस्ट बंद केली. त्यानंतर ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील ९ दहशतवादी तळे नष्ट केली. भारताच्या या कारवाईत बहावलपूरमधील जैशचे आणि मुरीदमधील लश्करचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त झाले. या कारवाईत शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतावर पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्यांचे सर्व हल्ले निष्प्रभ केले. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा कारवाई करत ११ हवाई तळांवर बॉम्ब टाकले. सरगोधा, नूर खान, जेकबाबाद आणि राहरयार खान हवाई तळांवर अचूक हल्ले करून पाकिस्तानची जगभरात नाचक्की केली. भारताचे हल्ले इतके प्रभावी होते की पाकिस्तानला दोन दिवसांत युद्धबंदीची मागणी करावी लागली.