पीएम मोदी यांना ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन, ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर उभय नेत्यांत महत्वाची चर्चा

एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावला असताना ब्राझीलच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत टॅरिफ धमक्यांद्वारे भारत आणि ब्राझीलवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असताना हे संभाषण महत्वाचे मानले जात आहे.

पीएम मोदी यांना ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन, ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर उभय नेत्यांत महत्वाची चर्चा
ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा आणि पीएम मोदी
| Updated on: Aug 07, 2025 | 10:48 PM

एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर भारतावर याचा काय परिणाम होणार याची चर्चा सुरु असताना आता आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचा फोन आला आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांच्या पार्श्वभूमीवर उभ देशांच्या नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या टॅरिफ संदर्भातील धमक्यांना फारशी किंमत न देताना भारत आपले हित आधी सांभाळणार असल्याचे म्हटले आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज म्हणजेच गुरुवारी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांचा फोन आला. यावेळी फोनवरुन दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा झाली आहे.

येथे पाहा पोस्ट –

कॉल दरम्यान, पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात ब्राझीलला दिलेल्या भेटीचाही उल्लेख केला आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, शेती, आरोग्य आणि परस्पर संबंधांमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी ठराविक मुद्यांवर सहमती दर्शवली होती. या चर्चेच्या आधारे, त्यांनी भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीला नवीन आयाम देण्याचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली आहे. आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. पंतप्रधान आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की “राष्ट्रपती लूला यांच्याशी चांगली चर्चा झाली. माझा ब्राझील दौरा संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवल्याबद्दल धन्यवाद. व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात आमची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जागतिक दक्षिणेकडील देशांमधील मजबूत, लोककेंद्रित भागीदारी सर्वांनाच फायदेशीर ठरते.”

हा कॉल का महत्त्वाचा आहे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ धोरणाने केवळ भारतालाच आयात कराचा तडाखा दिलेला नाही तर यामुळे ब्राझील आणि अमेरिकेत कटुताही आली आहे. ट्रम्प यांनी ब्राझीलवर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. यानंतर ट्रम्प यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांना सांगितले की ते कधीही फोन करून टॅरिफवर चर्चा करू शकतात. त्यानंतर अध्यक्ष लूला यांनी ट्रम्पची ऑफर नाकारली आणि म्हटले की त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना फोन केला तर बरे होईल.

ट्रम्प ब्राझीलवर का नाराज

ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो हे सरकारविरोधात विद्रोह केल्याच्या आरोपाखाली खटल्याला सामोरे जात आहेत आणि ट्रम्प यावर नाराज आहेत. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की बोल्सोनारो यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे आणि त्यांच्याविरुद्ध “विच हंट” चालवले जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी ब्राझीलवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यावर ब्राझीलच्या अध्यक्षांनी ट्रम्प त्यांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत आणि त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहेत असा हल्लाबोल केलेला आहे.