PM Modi Israel Visit : भारतीय सुरक्षित रहावेत म्हणून इस्रायलकडून मोठ्या अस्त्राची ऑफर पण भारत नकार देईल, कारण…

PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा इस्रायल दौऱ्यावर चालले आहेत. 25 आणि 26 फेब्रुवारी असा हा दोन दिवसीय दौरा असेल. दोन्ही देशांसाठी हा दौरा खूप खास आहे. इस्रायलमध्ये मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्याचं महत्व समजून घ्या.

PM Modi Israel Visit : भारतीय सुरक्षित रहावेत म्हणून इस्रायलकडून मोठ्या अस्त्राची ऑफर पण  भारत नकार देईल, कारण...
India-Israel Friendship
| Updated on: Feb 25, 2026 | 3:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय इस्रायलच्या महत्वपूर्ण दौऱ्यावर आहेत. मोदी तिथे दाखल होण्याआधी इस्रायली संसदेला तिरंग्याची लायटिंग करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. याआधी 2017 साली त्यांनी ऐतिहासिक इस्रायल दौरा केला होता. पश्चिम आशियाचं राजकारण एका महत्वपूर्ण वळणावर आहे. इराण-अमेरिका युद्धाचे ढग आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा इस्रायल-भारत मैत्रीचं एक नवीन उदहारण बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात भारत-इस्रायलमध्ये संरक्षणासंबंधी काही महत्वाच्या MOU वर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. संवेदनशील टेक्नोलॉजी शेअरिंग आणि संयुक्त उत्पादनावर भर दिला जाऊ शकतो. यामुळे भारताची ताकद कैकपटीने वाढेल.

फोर्ब्स इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, यावर्षी इस्रायल आणि भारतात $8.6 अब्ज डॉलर्सचा शस्त्रास्त्र करार होऊ शकतो. फ्रान्सनंतर इस्रायल भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश बनेल. रिपोर्टनुसार, या $8.6 बिलियन डॉलरच्या सौद्यात राफेल द्वारा निर्मित SPICE 1000 प्रिसिजन गायडन्स बॉम्ब, रॅम्पेज एयर-टू-सरफेस मिसाइल (250 km रेंज), एयर लोरा एयर-लॉन्च बॅलेस्टिक मिसाइल आणि आइसब्रेकर मिसाइल सिस्टम (300km रेंज) यांचा समावेश आहे.

कुठलं ड्रोन विकत घेणार?

द हिंदूच्या एका रिपोर्टनुसार, भारत इस्रायलकडून अतिरिक्त प्रमाणात हेरॉन एमके-2 मीडिम एल्टीट्यूड लॉन्ग एन्ड्यूरेंस (मेल) ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात आहे. एअरफोर्स टेक्नॉलॉजी डॉट कॉम नुसार हे ड्रोन एकदा उड्डाण केल्यानंतर हवेत 45 तास उड्डाण करु शकतात. त्याचवेळी इस्रायलने भारताला आर्यन डोम एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. आर्यन डोमकडे एक अभेद्य सुरक्षा कवच म्हणून पाहिलं जातं.

प्रोजेक्ट कुश काय आहे?

शत्रुची मिसाइल, ड्रोन्स आणि फायटर जेट्स पाडण्याची आर्यन डोमची क्षमता आहे. पण भारत इस्रायलची ही ऑफर स्वीकारण्याची फार शक्यता नाही. कारण भारताकडे S-400, आकाश यांच्याजोडीने अजूनही मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपली हवाई सुरक्षा क्षमता दाखवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन सुदर्शन चक्रची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत प्रोजेक्ट कुश आणि अन्य एअर डिफेन्स सिस्टिमवर काम चालू आहे. प्रोजेक्ट कुश अंतर्गत भारत स्वदेशी S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकसित करत आहे. त्यामुळे भारत इस्रायलची आर्यन डोमची ऑफर स्वीकारणार नाही.