पंतप्रधानांचे जपानमध्ये जंगी स्वागत, जपानी मुलाचा मोदींशी हिंदीतून संवाद; मोदींच्या नावाचा जयघोष

| Updated on: May 23, 2022 | 9:21 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानला पोहोचले आहेत. जपानमध्ये मोदींचे भव्य स्वागत करण्यात आलं. त्यांनी आपल्या भेटीसाठी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मुलांशी संवाद साधला.

पंतप्रधानांचे जपानमध्ये जंगी स्वागत, जपानी मुलाचा मोदींशी हिंदीतून संवाद; मोदींच्या नावाचा जयघोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद
Follow us on

टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे दोन दिवसांच्या जपान (Japan) दौऱ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी त्यांनी जपानला प्रस्तान केले. मोदी हे जपानमध्ये आयोजित क्वाड लीडर्स समिटमध्ये (Quad Leaders Summit) सहभागी होणार आहेत. 24 तारखेला पार पडणाऱ्या या शिखर परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेसे हे देखील सहभागी होणार आहेत. क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथील काही उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. तसेच जपानमधील काही प्रमुख नेत्यांशी चर्चा देखील करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोबतच भारतीय मुळनिवासी असलेल्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देखील ते सहभागी होणार आहेत. जपानमध्ये पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण जपानमध्ये पोहोचल्याचे सांगितले. जपानमध्ये स्थाईक झालेल्या भारतीय नागरिकांकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे.

पंतप्रधानांचे जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या या दौऱ्यात जपानची राजधानी असलेल्या टोकियोमधील हॉटेल न्यू ओटानी मध्ये मुक्काम करणार आहेत. या हॉटेलबाहेर भारतीयांसोबतच जपानी नागरिकांकडून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावून गेले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या मुलांशी देखील मोदींनी संवाद साधला. या संवादादरम्यान एक जपानी मुलगा रित्सुकी कोबायाशी याने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हिंदीत संवाद साधला. त्याचे हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व पाहून मोदींनी देखील आश्चर्य व्यक्त केले. तसेच या मुलाला तू एवढी चांगली हिंदी कशी शिकलास असा प्रश्न देखील केला. त्यानंतर या मुलाने मोदींच्या स्वागतासाठी लिहिलेला शुभेच्छा संदेशाचा स्विकार करत त्यांनी कोबायाशी याला ऑटोग्राफ देखील दिला. मोदींना भेटून आनंद झाल्याची प्रतिक्रिया या मुलाने दिली.

हे सुद्धा वाचा

हॉटेलमध्ये मोदींचा जयघोष

मोदी जपानला पोहोचले आहेत. जपानची राजधानी टोकियोमध्ये ते ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्या हॉटेलच्या बाहेर त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांची रांग लागली होती. यामध्ये जपानी नागरिकांसोबतच जपानमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांचा देखील समावेश होता. नागरिकांनी मोदींचे भव्य स्वागत केले. मोदींनी देखील या नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. त्यानंतर मोदीच्या जयघोषणाने हॉटलचा परिसर दुमदुमून गेला. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या देखील घोषणा देण्यात आल्या. मोदींना पाहाताच भारतीय नागरिकांनी तिरंगा फडकवला.

क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जपानला आले आहेत. ते 24 मे रोजी आयोजित शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेसे हे देखील सहभागी होणार आहेत. क्वाड परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बायडन, किशिदा आणि अल्बानेसे यांच्यासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. या बैठकीत विविध महत्त्वांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.