
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली आहे, अशा काही बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत आहेत. दरम्यान त्यानंतर आता इमरान खान अध्यक्ष असलेल्या पीटीआय पक्षाचे नेते आणि सीनेटर खुर्रम जीशान यांनी या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. इमारन खान जिवंत आहेत, त्यांना सध्या रावळपिंडी येथील अदियाला जेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे, यावेळी बोलताना जीशान यांनी एक मोठा दावा देखील केला आहे. इमरान खान यांना पाकिस्तानातून बाहेर पाठवण्यासाठी आता त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप खुर्रम जीशान यांनी केला आहे. गेल्या एक महिन्यापासून इमरान खान यांना एकटच आदियाला जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्यांना एक महिन्यापासून कोणालाच भेटू दिलं जात नसल्याचा दावा देखील जीशान यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इमरान खान यांना गेल्या एक महिन्यापासून जेलमध्ये एकटंच ठेवण्यात आलं आहे, त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाहीये, त्यांच्या वकिलांना देखील इमरान खान यांना भेटू दिलं जात नाहीये. एक महिन्यापासून इमरान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट झालेली नाहीये, दरम्यान याविरोधात पीटीआयाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आणि इमरान खान यांच्या कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली होती. इमरान खान यांना भेटू द्यावं, अशी कोर्टाची ऑर्डर असताना देखील सरकार इमरान खान यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देत नसल्याचा आरोपही खुर्रम जीशान यांनी केला आहे.
जीशान यांनी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना असं म्हटलं आहे की, ही खूप वाईट गोष्ट आहे, इमरान खान यांच्यासंदर्भात पाकिस्तान सरकारकडून पूर्णपणे मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तान सरकारकडून इमरान खान यांनी देश सोडून जावा यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. इमरान खान यांची तब्येत कशी आहे, यासंदर्भात माहिती देणारा एकही फोटो किंवा व्हिडीओ गेल्या महिना भरापासून समोर आलेला नाहीये. पाकिस्तान सरकारकडून इमरान खान यांच्यापुढे देश सोडून जाण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आल्याचा खळबळजनक दावा खुर्राम जीशान यांनी केला आहे.