
Russia And Ukraine War Update : युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध लवकरात लवकर थांबायला हवे यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. रशियाकडून युक्रेनवर रोजच हल्ले केले जात आहेत. एकीकडे संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत शांतता, सहकार्य, सद्भावना या मूल्यांचा पुढाकार केला जात असताना आता रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर जोरदार हल्ला केला आहे. गेल्या महिन्याभराताला हा सर्वाधिक मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात एका 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर चार लोकही मृत्युमुखी पडले असून 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रशियाने रविवारी रात्री युक्रेनची राजधानी किव शहरावर हे हल्ले केले आहेत. आपल्या या हल्ल्यांत रशियाने किव शहरावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले आहेत. गेल्या महिन्यात रशियाने किव शहरावर अशाच पद्धतीने हल्ला केला होता. या हल्ल्यात तिथे एकूण 21 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता रविवारी रशियाने पुन्हा एकदा किव शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या वायुसेनेने निवेदन प्रसिद्ध केले आहे. निवेदनातील माहितीनुसार रशियाने किव शहरावर एकूण 595 स्फोटक ड्रोन, 48 क्षेपणास्त्र डागले. हे हल्ले झाल्यानंतर युक्रेनमधील हवाई संरक्षण प्रणाली लगेच सक्रिय करण्यात आली. त्यामुळे युक्रेनी सेनेने रशियाचे 566 ड्रोन तसेच 45 क्षेपणास्त्र हाणून पाडले. तर उर्वरित ड्रोन आणि मिसाईल्स किव शहरावर पडली. त्यामुळे तिथे काही जीवित आणि वित्तहानी झाली.
रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने आपल्या हल्ल्यात जापोरिज्जिया, खमेलनित्सकी, सूमी, मायकोलाइव, चेर्निहिव आणि ओडेसा या प्रदेशांना लक्ष्य केलं. “संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा चालू असताना हा नृशंस हल्ला झाला आहे. रशिया अशा प्रकारे त्यांचा खरा चेहरा दाखवतो. जगातील देशांनी रशियावर दबाव वाढवायला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी दिली.