
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीवमधील मंत्री परिषदेच्या इमारतीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या मदतीने हा हल्ला केला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. हा विध्वंस पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी ‘आता रशियावर अधिक कडक आर्थिक निर्बंध लादण्याची वेळ आली आहे’ असं विधान करत रशियाला शिक्षा देण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हे युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियाला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी अमेरिका निर्बंध आणखी कडक करण्यात तयार आहे. आतापर्यंत लादलेले निर्बंध पुरेसे नाहीत. जर रशियाने आक्रमक हल्ले सुरू ठेवले तर आम्ही अधिक कठोर पावले उचलू. रशियाला युद्ध संपवण्यास आणि शांतता चर्चा सुरू करण्यास भाग पाडणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
रशियाची कृती जागतिक शांततेला धोक्यात आणत आहेत असं म्हणत ट्रम्प यांनी युरोपियन मित्र राष्ट्रांनाही पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. कारण आज रशियाने कीवमधील युक्रेनियन सरकारच्या मुख्य इमारतीवर हल्ला केला. यावर बोलताना युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को म्हणाल्या की, या हल्ल्यात इमारतीच्या छताला आणि वरच्या मजल्यांना नुकसान झाले आहे. तसेच हल्ल्यानंतर आग लागली होती. समोर आलेल्या माहितीनुसार रशियन सैन्याने एकाच वेळी 800 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
देशातील 37 ठिकाणी 9 क्षेपणास्त्रे आणि 56 रशियन ड्रोन पडल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. या हल्ल्यात एका मुलासह चार जणांचा मृत्यू झाला. रशियाकडून राजधानी कीवमधील स्व्याटोशिंस्की भागात नऊ मजली इमारतीवर हल्ला करण्यात आला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत बोलताना म्हटले की, ‘ही सामान्यांची हत्या आहे. खरी राजनैतिक कूटनीति खूप आधीच सुरू होऊ शकली असती, मात्र जगाची राजकीय इच्छाशक्ती भंग व्हावी म्हणून रशिया जाणूनबुजून युद्ध वाढवत आहे.’