Russia-Ukraine Conflict: पुतीनचा एक घाव आणि यूक्रेनचे तीन तुकडे, अमेरीका, नाटोला दातखिळी

गेल्या कित्येक वर्षांपासून तिथं फुटीरतावादी सक्रिय आहेत. अर्थातच रशियाच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. डोनेत्स्क आणि लुंगस्कमध्ये रशियन भाषा बोलणाऱ्यांचं प्राबल्य आहे आणि ते यूक्रेनचा भाग असूनही रशियाकडे झुकलेले आहेत.

Russia-Ukraine Conflict: पुतीनचा एक घाव आणि यूक्रेनचे तीन तुकडे, अमेरीका, नाटोला दातखिळी
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रसंबोधन करताना यूक्रेनच्या दोन प्रदेशांना स्वतंत्र देशाची मान्यता दिली
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2022 | 8:35 AM

यूक्रेनसोबतच्या संघर्षावर रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. एका अर्थानं रशियानं (Russia) यूक्रेनचे (Ukraine) तीन तुकडे पाडले आहेत. कारण यूक्रेनच्या दोन प्रदेशांना स्वतंत्र देशाची मान्यता दिलीय. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी तशा आदेशावर सही केलीय. हे दोन प्रदेश आहेत डोनेत्स्क (Donetsk) आणि लुंगस्क. (Lugansk) पुतीन यांना राष्ट्रसंबोधन केलं, त्यात त्यांनी ही मोठी घोषणा केलीय. ह्या घोषणेनंतर यूक्रेनच्या दोन्ही भागात आता रशियन लष्कर पाठवण्याचा मार्ग मोकळा झालाय. सव्वा लाखापेक्षा जास्त रशियन सैन्यानं आधीच यूक्रेनच्या सीमेवर तळ ठोकलेला आहे. नव्या आदेशानंतर यातलं निम्म सैन्य तरी आता ह्या नव्यानं तयार झालेल्या दोन्ही देशात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीननं तसा आदेश दिलाय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर यूक्रेन आणि रशिया यांच्यातला तणाव आणखी वाढला आहे.


पुतीनच्या राष्ट्रसंबोधनातले मोठे मुद्दे
यूक्रेनमध्ये रशिया कुठल्याही क्षणी सैन्य घुसवेल आणि हल्ला करेल अशी शक्यता अमेरीका वर्तवत होती. ती शक्यता अजूनही जीवंत आहे. पण त्यापुर्वीच ब्लादिमीर पुतीन यांनी स्फोटक निर्णय घेत यूक्रेनचे तुकडे पाडलेत. ते करताना त्यांनी राष्ट्र संबोधन केलंय, पाहुयात त्यातले 5 मोठे मुद्दे.

  1. डोनेत्स्क पिपल्स रिपब्लिक आणि पिपल्स रिपब्लिक लुंगस्क ह्या दोन्ही सार्वभौम देशांना मान्यता देण्यासाठी मी संसदेला सांगेल आणि त्यानंतर ह्या दोन्ही देशांसोबत मैत्री आणि परस्पर सहाय्यता करणाऱ्या दोन करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.
  2. यूक्रेनचा नाटोत समावेश म्हणजे रशियाच्या सुरक्षेला थेट धोका आहे. ज्या गतीनं नाटो सैनिकांना यूक्रेनमध्ये तैनात केलं गेलं, ते हेच दर्शवतं. यूक्रेनमध्ये नाटो सैनिकांची प्रशिक्षण केंद्र म्हणजे एक प्रकारे ते नाटो सैनिकांचे तळच आहेत. विशेष म्हणजे यूक्रेनची राज्यघटना ही विदेशी सैन्य तळांना परवानगी देत नाही.
  3. यूक्रेनचे मनसुभे हे आण्विक हत्यार बनवण्याचे आहेत. आधूनिक यूक्रेनची निर्मिती रशियानेच केलेली आहे. 1917 च्या क्रांतीनंतर लगेचच त्याची प्रक्रिया सुरु झाली होती. बोल्शेविक धोरणांमुळे सोव्हिएत यूक्रेनचा उदय झाला. आजही ब्लादिमीर इलिच लेनिनचा यूक्रेन असच म्हटलं जातं. लेनिन हेच यूक्रेनचे निर्माते आहेत आणि ऐतिहासिक कागदपत्रं त्याचे पुरावे आहेत.
  4. आता यूक्रेनमध्ये लेनिनच्या पुतळ्यांना, स्मारकांना उद्धवस्त केलं जातंय. याला ते डीकम्यूनायझेशन म्हणतात. तुम्हाला डीकम्यूनायझेशन हवंय? हे अनावश्यक आहे. डीकम्यूनायझेशन नेमकं कसं असतं ते यूक्रेनला दाखवायला आम्ही सज्ज आहोत.
  5. यूक्रेनला सामुहिक विनाश करणारी हत्यारं मिळाली तर जागतिक स्थितीत मोठा बदल होणार. अलिकडच्या काळात पश्चिमी देशांच्या हत्यारांनी यूक्रेन भरुन गेलाय. नाटोचे प्रशिक्षक यूक्रेनच्या युद्धाभ्यासा दरम्यान हजर होते. यूक्रेन हा अमेरीकेची गुंतवणूक असलेला कठपुतळी देश आहे.
  6. यूक्रेन हा गॅसची चोरी करतो. एवढच नाही तर नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच गॅसचा वापर आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी केला. यूक्रेनच्या नेत्यांना कुठल्याही जबाबदारीशिवाय आमच्याकडून सगळ्या गोष्टी हव्या आहेत.
  7. आमच्यावर निर्बंध लावण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा केवळ एकच उद्देश आहे. रशियाचा विकास रोखणे आणि ते तसं करतील. पण आम्ही आमचं सार्वभौमत्व, राष्ट्रहित आणि मुल्यांसोबत तडजोड करणार नाही.
  8. सध्यस्थितीत समान वार्ताच्या आमच्या प्रस्तावाला अमेरीका आणि नाटोच्या तर्फे कुठलेही उत्तर आलं नाही. जर आमच्या देशाच्या सुरक्षेला धोका वाढत असेल तर त्याला प्रत्युत्तर म्हणून कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे. आणि आम्ही तेच करणार.


यूक्रेनची प्रतिक्रिया

रशियानं ज्या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र देशाची मान्यता दिलीय त्या दोन्ही प्रदेशांना रशियन बॉर्डर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तिथं फुटीरतावादी सक्रिय आहेत. अर्थातच रशियाच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. डोनेत्स्क आणि लुंगस्कमध्ये रशियन भाषा बोलणाऱ्यांचं प्राबल्य आहे आणि ते यूक्रेनचा भाग असूनही रशियाकडे झुकलेले आहेत. आता त्याच दोन्ही प्रदेशांना पुतीननं स्वतंत्र देश केल्यामुळे यूक्रेनची स्थिती अवघड झालीय. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्कींनी रशियाच्या ह्या निर्णयामुळे घाबरत नसल्याचं म्हटलंय. जेलेन्स्कींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर स्कोल्ज यांच्याशी चर्चा केलीय. विशेष म्हणजे रशियाचा हा निर्णय शांती कराराचं उल्लंघन असल्याचं वक्तव्य जर्मन चान्सलरनी केलंय.

हे सुद्धा वाचा:
रशिया आजच यूक्रेनवर हल्ला करणार? 24 फोटोतून समजून घ्या काय घडतंय युद्धभूमीवर?
Russia-Ukraine Crisis: युक्रेनवर युध्दाचे ढग गडद, युद्ध झाल्यास व्यापारावर होईल मोठा परिणाम