
12 दिवसाच्या युद्धानंतर इराणला समजलं असेल की त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण?. अरब देशांनी इराणला वाऱ्यावर सोडलं. तुर्की आणि पाकिस्तानने पाठिमागून इस्रायल-अमेरिकेला साथ देऊन मोठा विश्वासघात केला. प्रत्यक्ष युद्धकाळात रशियाने इराणला संयुक्त राष्ट्र आणि अन्य मंचांवर साथ दिली. उघडपणे अमेरिका-इस्रायलचा विरोध केला. सैन्य मदत दिली नाही. पण कूटनितीक साथ दिली. आता तोच रशिया इराणच्या अणवस्त्र संपन्न राष्ट्र बनण्याच्या मार्गात खोडा घालत आहे.
इराणच्या संसदेने बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेला सहकार्य न करण्याच विधेयक मंजूर केलं. हे विधेयक प्रत्यक्षात आल्यास इराण कोणत्याही देखरेखीशिवाय अणवस्त्र बनवू शकतो. “इराणने आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेसोबत आपलं सहकार्य कायम ठेवावं अशी रशियाची इच्छा आहे” असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव गुरुवारी म्हणाले.
इराणने काय तर्क दिलाय?
इस्रायल-अमेरिकेने इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले केल्यानंतर इराणमध्ये IAEA विरोधात संतापाची भावना आहे. IAEA ही संयुक्त राष्ट्राची संस्था इराणवरील हल्ले रोखण्यात अपयशी ठरली आणि त्यांनी साधा निषेध सुद्धा केला नाही, असा इराणने IAEA सोबत सहकार्य न करण्यासाठी तर्क दिला आहे.
रशियाची भूमिका काय?
इराणला अणवस्त्र संपन्न देश बनण्यापासून रोखण्यासाठी इस्रायल-अमेरिकेने हा हल्ला केला होता. रशियासोबत इराणची मैत्री आहे. रशियाने इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करताना तेहरानला शांततापूर्ण अणूऊर्जा कार्यक्रमाचा अधिकार आहे असं म्हटलं होतं.
इराणी संसदेच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया?
इराणच्या संसदेकडे कार्यकारी शक्ती नाही असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव म्हणाले. त्यामुळे त्यांचा निर्णय हा सल्ला स्वरुपाचा आहे. एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणाले की, ‘IAEA सोबत इराणने सहकार्य सुरु ठेवावं अशी आमची इच्छा आहे’ “प्रत्येकाने इराणच्या सर्वोच्च नेत्याचा सन्मान करावा, हीच आमची इच्छा आहे. त्यांनी वारंवार सांगितलय की, इराणकडे अणवस्त्र बनवण्याची कुठलीही योजना नाहीय आणि नसेल” असं सर्गेई लावरोव म्हणाले.