
टॅरिफचा मुद्दा असो की वेगवेगळे निर्णय, काही वादग्रस्त वक्तव्य किंवा जगाला धडकी भरवणाऱ्या घोषणा पुन्हा सत्तेवर आल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन सातत्याने चर्चेत असते. ट्रम्प आणि त्यांचे मंत्री अनेक मुद्यांवरून जगातील विविध देशांवर आगपाखड करत असतानाच आता ट्रम्प यांच्याच पार्टीत नकोसं काही घडलं असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत, त्यांच्याच दोन उच्च आर्थिक अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती इतकी टोकाला पोहोचली की एक अधिकाऱ्याने दुसऱ्याला थेट धमकी दिली. ‘मी तुझा चेहरा फोडून टाकीन… बाहेर पड’ अशा संतप्त शब्दांत त्यांच्यात बोलाचाली झाल्याचे समोर आले आहे.
वॉशिंग्टन डीसीमधील एका खास क्लब “एक्झिक्युटिव्ह ब्रांच” च्या उद्घाटनादरम्यान आणि पॉडकास्ट होस्ट चामथ पलिहापितिया यांच्या वाढदिवसानिमित्तच्या पार्टीत ही घटना घडली. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या ज्या दोन अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला ते कोणी साधेसुधे नव्हे तर त्यामध्ये अर्थमंत्री, म्हणजेच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट आणि फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सीचे संचालक बिल पुल्ट यांचा समावेश होता.
नेमकं काय घडलं ?
सीएनएनच्या वृत्तानुसार, स्कॉट बेसंटने एक्झिक्युटिव्ह क्लबमध्ये जेवणादरम्यान पुल्टे यांच्या तोंडावर बुक्का मारण्याची धमकी दिली. बिल पुल्ट हा ट्रम्प यांच्याकडे आपली चुगली करतच असल्याते बेसंट यांना कळले आणि त्यानंतर रागाच्या भरात पुढचा सगळा प्रकार घडला. पुल्ट याचे कारनामे कळताच बेसंट संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने पुल्टला तोंड फोडण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 4 सप्टेंबरला वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या एका खासगी डिनरदरम्यान घडला. या डिनरसाठी वाहतूक सचिव शॉन डफी, वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक, गृह सचिव डग बर्गम आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांसारख्या अनेक मोठमोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. सुमारे 30 पाहुण्यांसाठी, उच्च दर्जाचे क्रिस्टल आणि पोर्सिलेनने सजवलेले लांबलचक टेबल ठेवण्यात आलं होतं.
पार्टीत पेटला वाद
पण कॉकटेल पार्टीत गोंधळ माजला कारण बेझंटने पुल्टला शिवीगाळ करून भयंकर टीका केली. खरं तर, स्कॉट बेझंटने अनेक लोकांकडून ऐकले होते की फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सीचे संचालक असलेले पुल्ट हे ट्रम्पसमोर त्याच्याबद्दल (बेझंट) वाईटसाईट बोलत होते. त्यावरूनच तो संतापला. संधी मिळताचा बेझंटने पुल्टला सुनावलं. “तुम्ही माझ्याबद्दल राष्ट्रपतींशी का बोलत आहात? गप्प बसा.” “मी तुमच्या तोंडावर मुक्का मारेन.” असंही तो म्हणाला.
अमेरिकन राजकारणावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या पॉलिटिको या वेबसाइटमध्ये या वादाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मात्र बेझंट याचा हा अवतार पाहून पुल्ट स्तब्ध झाले. या पार्टीला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते, या तणावपूर्ण चकमकीनंतर, क्लबचे सह-मालक आणि वित्तपुरवठादार ओमिद मलिक यांना हस्तक्षेप करावा लागला. परंतु बेझंट ऐकायला तयार नव्हेत, पुल्ट यांना पार्टीतून बाहेर हकलावे यावर ते ठाम होते.
एकतर तो पार्टीत राहील किंवा मी राहील असं बेझंटने सुनावलं. किंवा आपण बाहेर जाऊ शकतो असंही तो म्हणाला. कशासाठी ? बोलण्यासाठी ? असं पुल्टने त्याला विचारलं. त्यावर संतप्त बेझंट म्हणाला, नाही, मी तुला जबर मार देईन. त्यांच्यातला हा संवाद ऐकून सगळेच अवाक झाले.
अखेर ही परिस्थिती शांत करण्यासाठी, ओमिद मलिकने त्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं आणि बेझंटला शांत करण्यासाठी क्लबच्या दुसऱ्या भागात घेऊन गेला. जेवणाच्या वेळी, बेझंट आणि पुल्ट टेबलाच्या विरुद्ध टोकांना बसले होते. बेझंट, पुल्ट, मलिक आणि व्हाईट हाऊसने या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
तिघांनी एकत्र काम करण्याची ट्रम्प यांना होती आशा
ट्रम्प यांनी मे महिन्यात घोषणा केली होती की बेझंट, वाणिज्य सचिव लुटनिक आणि पुल्ट एकत्र काम करतील. परंतु ट्रम्प प्रशासनातील सूत्रांच्या मते, या अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचे युद्ध सुरू झाले आहे. या वादाशी परिचित असलेल्या काही लोकांचे म्हणणे आहे की बेझंटचा असा विश्वास आहे की पुल्ट यांनी स्वतःला अशा प्रकरणांमध्ये गुंतवले आहे जे अर्थमंत्र्यांना त्यांचे अधिकार क्षेत्र वाटतात.
दरम्यान ट्रम्प सल्लागाराशी बेझंटचा वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, बेझंटचा एलोन मस्कशी जोरदार वाद झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली होती. तर रविवारी ट्रम्प यूएस ओपन स्पर्धेसाठी उपस्थित होते. त्यावेळी बेझंटही त्यांच्यासोबत होता पण त्याला राष्ट्राध्यक्षांपासून काही जागा दूर बसवले गेले.