
जरा कल्पना करा, एक असं जग जिथे “पगाराच्या” बदल्यात महिलेची अब्रू, तिची प्रतिष्ठा लुटली जाते. जिथं निष्पाप मुलांना जिवंत जाळले जातं आणि फक्त बोलू शकत नाही म्हणून अपंग लोकांना शिक्षा दिली जाते. ही एखाद्या चित्रपटातली कथा किंवा काल्पनिक काही नाही तर खरोखर एका देशात घडणारी सत्यघटना आहे. प्रत्यक्षात हे दक्षिण सुदान या आफ्रिकन राष्ट्राचं भेदक वास्तव आहे. एक देश अजूनही स्वतःच्या जखमांमुळे अश्रू ढाळताा दिसत आहे. हे प्रकरण अनेक वर्ष जुनं असलं तरी त्याबद्दल ज्याला कळंत तो ते ऐकून व्यथित होतो, कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल अशीच ही कहाणी आहे.
पगाराच्या बदल्यात लुटा स्त्रियांची अब्रू
Al Jazeera आणि The Guardian च्या रिपोर्टनुसार, दक्षिण सुदानच्या सैन्याला आणि सरकार समर्थक लढणाऱ्यांना पगाराच्या बदल्यात महिलांवर अत्याचार करण्याची “परवानगी” देण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) रिपोर्टमध्ये असं सूचित करण्यात आलं की, सरकारी सैनिकांना पगाराच्या बदल्यात महिलांवर बलात्कार करण्याची मोकळीक देण्यात आली होती. 2013 साली सुरू झालेल्या गृहयुद्धादरम्यान हा घृणास्पद प्रकार सुरू झाला, तेव्हा सत्तेच्या लढाईमुळे या देशातून माणुसकी अक्षरश: नष्ट झाली.
UN च्या टीमला एका महिलेने सांगितलं की, पाच सैनिकांनी तिला विवस्त्र केलं आणि रस्त्याच्या कडेला तिच्या मुलांसमोरच तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हे तर नंतर तिला झुडपात नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला आणि जेव्हा ती परत आली तेव्हा तिची मुलं तिथून गायब झाली होती.
मुलांना जाळणं, दिव्यांगांची हत्या
या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की सरकारी सैनिकांनी (लहान) मुलांना आणि दिव्यांग लोकांना जाळलं, तसेच अनेक लोकांना कंटेनरमध्ये बंद केलं, श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला. झाडांवर लटकवून, तुकडे करून त्यांची हत्या केली, अशी भयानक कृत्य तिथे घडली. हे “जगातील सर्वात वाईट मानवी हक्क उल्लंघनांपैकी ” असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख झैद राद अल-हुसेन यांनी म्हटले होते. .
आज परिस्थिती काय ?
आज 2025मध्ये जग खूप पुढारलं असलं तरी तिथली अवस्था आजही फार चांगली नाही. गृहयुद्ध संपले असले, तरीही अत्याचार, उपासमार आणि हिंसाचाराच्या घटना अजूनही सुरू आहेत. Amnesty International आणि UNHCRच्या अलीकडच्या अहवालांवरून असं दिसून येते की लाखो लोक निर्वासित छावण्यांमध्ये रहात आहेत, जिथे महिला आणि मुले आजही असुरक्षित आहेत. दक्षिण सुदान अजूनही जगातील सर्वात कमी विकसित आणि संघर्षग्रस्त देशांपैकी एक मानला जातो. जोपर्यंत महिला सुरक्षित नाहीत तोपर्यंत एखाद्या देशाला स्वतंत्र मानले जाऊ शकते का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.