Sri Lanka PM Mahinda Rajapaksa: आर्थिक संकट भोवलं; श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे राजीनामा देण्याची शक्यता

| Updated on: May 07, 2022 | 2:55 PM

Sri Lanka PM Mahinda Rajapaksa: आर्थिक संकटामुळे श्रीलंकन नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे येथील जनता रस्त्यावर उतरली आहे.

Sri Lanka PM Mahinda Rajapaksa: आर्थिक संकट भोवलं; श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे राजीनामा देण्याची शक्यता
आर्थिक संकट भोवलं; श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे राजीनामा देण्याची शक्यता
Image Credit source: ani
Follow us on

कोलंबो: श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान महिंदा राजपक्षे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आपले भाऊ आणि देशाचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी केलेल्या आवाहनानंतर महिंदा राजपक्षे (Sri Lanka PM Mahinda Rajapaksa) यांनी पायउतार होण्याचं ठरवलं असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रपती गोटबाया यांनी राजपक्षे यांना आर्थिक संकटामुळे (Economic Crisis) पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती. ही सूचना राजपक्षे यांनी मान्य केल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट ओढवलं आहे. परदेशी कर्ज चुकवण्यासह परदेशातून महत्त्वाच्या वस्तु आयात करण्यासाठीचे पैसेही श्रीलंकेकडे उरले नाहीत. त्यामुळे देशातील नागरिकांचा अनेक तास वीज पुरवठाही खंडित केला आहे. एवढेच नव्हे तर श्रीलंकेतील नागरिकांना अन्न, औषध आमि इंधन सुद्धा मिळण्यास मारमार झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनात कॅबिनेटची विशेष बैठक पार पडली. त्यात महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा देण्यास संमती दर्शवली असल्याचं सांगितलं जात आहे. देशात आर्थिक संकट ओढवल्याने तुम्ही पदाचा राजीनामा द्यावा, अशी सूचना कॅबिनेटने राजपक्षे यांना केली आहे, असं वृत्त आहे. राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर कॅबिनेटही बरखास्त होईल. माझ्या राजीनाम्यामुळे श्रीलंका आर्थिक संकटातूनबाहेर येणार असेल तर मी तेही करायला तयार आहे, असं राजपक्षे यांनी म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

जनतेकडून राजीनाम्याची मागणी

आर्थिक संकटामुळे श्रीलंकन नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे येथील जनता रस्त्यावर उतरली आहे. सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे. त्यामुळे आर्थिक आणि राजकीय संकटातून बाहेर पडणं राष्ट्रपतींना कठिण होऊन बसलं आहे. कोरोना महामारीमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशात आर्थिक संकट आलं आहे. कारखाने बंद आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. तर, श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री प्रसन्ना रानातुंगा, नकाला गोदाहेवा आणि रमेश पथिराना आदी मंत्री राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर सहमत झाले आहेत. तर राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याने देश आर्थिक संकटातून बाहेर येणार नाही असं मंत्री विमलवीरा दिसानयके यांनी म्हटलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोमवारी राजीनाम्याची घोषणा?

दरम्यान, महिंदा राजपक्षे सोमवारी राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याचं एएनआयने म्हटलं आहे. राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर कॅबिनेटमध्ये फेरबदल होईल. श्रीलंकन सरकार आपल्या देशातील नागरिकांना वीज आणि खाद्यपदार्थही पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना शेजारील देशांकडे मदतीचा हात पसरावा लागत आहे.