पाकिस्तानच्या बलूचीस्तानात सैन्याच्या कँपवर आत्मघाती हल्ला, 18 जवानांचा मृत्यू
BLA च्या मते , धमाक्यानंतर फतेह स्क्वॉडचे अतिरेकी कँपमध्ये घुसले आणि त्यांनी धमक्यात वाचलेल्या सुरक्षा दलांवर हल्लाबोल केला. यात कोऑर्डिनेटेड ऑपरेशन अंतर्गत जवळच्या एका सिक्युरिटी पोस्टलाही टार्गेट करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या बलुचीस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात एका मिलिट्री कँपवर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १८ पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बलोच लिबरेशन आर्मी (BLA) ने एका व्हिडीओ मॅसेजमध्ये म्हटले आहे की मजीद ब्रिगेडने कंदवा भागात गाडीने चालणाऱ्या इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (VBIED)चा वापर करुन हल्ला केला. ज्यात मिलिट्री कँप आणि आसआपचे सिक्युरिटी चेकपॉईंट नष्ट झाले आहे. ग्रुपने हा देखील दावा केला आहे की धमाक्यानंतर अनेक अन्य जवान देखील जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागातील मस्तुंग जिल्ह्यात एका सैन्य कँपवर गुरुवारी बलोच लिबरेशन आर्मीने आत्मघाती हल्ला केला आहे. यात किमान १८ पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. बलोच लिबरेशन आर्मी (BLA) ने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने आत्मघाती हल्ला करणाऱ्याची ओळख मस्तुंगच्या खडकोचा येथे राहणाऱ्या उसामा शाहवानी उर्फ वदूद अशी केली आहे. शाहवानी साल २०२२ मध्ये संघटनेत सामील झाले होते आणि साल २०२४ मध्ये मजीद ब्रिगेडचे ते सदस्य झाले. बीएलएने पुढे दावा केला की शाहवानी याने कलात, नागाहो आणि शूर परोदमध्ये अनेक ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता. त्याने नुश्कीत त्यांच्या तथाकथित ऑपरेशन हेरोफ II अंतर्गत तीन दिवस लढाई लढली होती असेही त्यांनी म्हटले आहे.
या बीएलए गटाने या निवेदनाचा वापर बलुचिस्तानमधील खनिज उत्खनन आणि गुंतवणूक प्रकल्पांना आपला विरोध पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठी आणि अशा कार्यात सहभागी असलेल्या परदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांना धमकावण्यासाठीही केला आहे.
तोपर्यंत आमची मोहिम सुरुच राहणार – बीएलएची धमकी
या गटाने विशेषतः ‘पाकिस्तान मिनरल्स इन्व्हेस्टमेंट फोरम २०२६’ ला लक्ष्य केले आणि असा आरोप केला की, प्रांतातील खनिज प्रकल्पांचा उद्देश तेथील नैसर्गिक संसाधनांचे शोषण करणे हा आहे. या प्रकल्पांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांवर हल्ला केला जाऊ शकतो, असा इशाराही संघटनेने दिला. जोपर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दल बलुचिस्तानमधून माघार घेत नाहीत आणि हा प्रदेश मुक्त होत नाही, तोपर्यंत आपली सशस्त्र मोहीम सुरूच राहील, असे बीएलएने म्हटले आहे.