
NASA Earth Orbit Missions: NASA ची अनुभवी आणि लोकप्रिय अंतराळवीर सुनीता विलियम्सने 27 वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. तिची निवृत्ती ही 27 डिसेंबर 2025 रोजीपासून प्रभावी झाली. तिने तिच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन (ISS)वर तीन मोहिमा पूर्ण केल्या. तर मानवी अंतराळ उड्डाणात अनेक विक्रम नावावर कोरले. तिची निवृत्ती ही अंतराळ उड्डाणाच्या एका युगाचा शेवट मानल्या जातो. मूळ भारतीय वंशाची सुनिता विलियम्सविषयी देशातही अनेकांच्या मनात हळवा कोपरा आहे. तिने निवृत्तीनंतर भारतात येऊन अंतराळ विज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याची अनेकांची इच्छा आहे.
608 दिवस अंतराळात मुक्काम
NASA नुसार, सुनीता विलियम्सने एकूण 608 दिवस अंतराळात मुक्काम ठोकला. इतर कोणत्याही अंतराळवीरापेक्षा ती सर्वाधिक वेळा अंतराळ स्थानकात होती. तिने अंतराळात 9 स्पेसवॉक केले. त्याचा कालावधी 62 तास 6 मिनिटे इतका होता. एखाद्या महिला अंतराळवीराकडून अवकाशात, अंतराळात करण्यात आलेला हा सर्वाधिक चालण्याचा विक्रम आगहे. तर चालण्याच्या एकूण नोंदीत ती चौथ्या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर अंतराळात मॅरेथॉन धावण्याचा विक्रम करणारी ती पहिली अंतराळवीर ठरली आहे.
नासाचे प्रशासक जॅरेड आयजॅकमॅन यांनी सुनीता विलियम्स मानव अंतराळ उड्डाणांमध्ये अग्रणी असल्याचे आणि तिने अंतराळ स्टेशनवर तिच्या नेतृत्वात भविष्यासाठी एक मोठी पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. तिच्या योगदानामुळे चंद्रासाठी आर्टेमिस मिशन आणि भविष्यात मंगळ ग्रहासाठीच्या मोहिमांना गती आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2006 मध्ये पहिल्यांदा स्पेस शटल डिस्कवरीतून उड्डाण
सुनीता विलियम्सने पहिल्यांदा डिसेंबर 2006 मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरीतून अंतराळासाठी झेप घेतली. त्यानंतर 2012 मध्ये तिने कजाकिस्तानच्या बॅकोनुर कॉस्मोड्रोममधून अंतराळ यात्रा केली. ती काही काळ अंतराळ स्टेशनची कमांडर होती. तर काही दिवसांपूर्वी जून 2024 मध्ये बोईंग स्टारलाईनर मिशनअंतर्गत ती अंतराळात पोहचली होती. मार्च 2025 मध्ये ती पृथ्वीवर परतली. नासाचे जॉनसन स्पेस सेंटरचे निर्देशक वनेसा वाईचे यांनी सुनीताचे करिअर, नेतृत्व गुण, स्वतःला मोहिमेत झोकूण देण्याचा गुण, तिचे धैर्य आणि साहसीपणाचे तोंडभरून कौतुक केले आहे. तिच्यामुळे अनेकांना अंतराळात भरारी घेण्याची प्रेरणा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर अंतराळ हे आपले सर्वात आवडते ठिकाण होते. याठिकाणी इतका वेळ व्यतीत करण्याचा सन्मान आपल्याला मिळाला याविषयी तिने कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मोहिमेमुळे आता नासाला चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी रस्ता मोकळा झाला हे ऐकून चांगलं वाटल्याचे म्हटले आहे.