16 December | Ind-Pak | युद्धभूमीतून पळ काढत शरणागती पत्करणाऱ्या पाकिस्तानचा लाचार जनरल नियाजीची गोष्ट!

| Updated on: Dec 16, 2021 | 1:13 PM

भारत-पाकिस्तान युद्धाच्या कहाण्यांचा हा एक ज्वलंत आणि अभिमानास्पद क्षण आहे. पाकिस्तानची लाचारी सिद्ध करणारी ही घटना आहे बरोबर पन्नास वर्षांपूर्वीची! पन्नास वर्षांपूर्वीचा तो डिसेंबर महिना आणि ते दिवस आजही महत्त्वाचे आणि लक्षात ठेवण्यासारखे का आहेत, हे अधोरेखित करणारी घटना...

16 December | Ind-Pak | युद्धभूमीतून पळ काढत शरणागती पत्करणाऱ्या पाकिस्तानचा लाचार जनरल नियाजीची गोष्ट!
Follow us on

2021चे आता फक्त काही दिवसच शिल्लक राहिलेत. 2021 रिटायर्ड होतंय. वेळ, दिवस, वर्ष एकदा निघून गेले, की पुन्हा येत नाहीत. ते धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे असतात. एकदा गेले की कायमचे गेले!

दिग्गजांनी सांगून ठेवलंय, की वर्तमानाची नाळ ही भूतकाळाशी सोडलेली असते. त्याचं जिवंत उदाहरण आहे, डिसेंबर 2021. या डिसेंबर 2021चा संबंध 1971शी देखील आहे. बरोबर पन्नास वर्षांबाबत आपण आता 2021 संपत असताना का बोलायला हवं? त्याच्या पाऊलखुणा का जाणून घ्यायला हवा? याची गोष्ट आज समजून घेऊयात.

पन्नास वर्षांपूर्वीचा किस्सा!

बरोबर पन्नास वर्षांपूर्वींची गोष्टय. तो काळ ब्लॅक एन्ड व्हाईटचा होता. टीव्हीही तेव्हा बॉक्सवालेच येत होते. सगळ्यांकडे तेव्हा टीव्हीही नसायचे. फक्त श्रीमंतांकडे असायचे! फोन, मोबाईल, सोशल मीडियातर (Social Media) कुणाच्या गावीही नव्हता तेव्हा. 1971चा तो काळ होता. महिना डिसेंबरचा सुरु होता. दिवस थंडीचे होते.

गोठवणाऱ्या थंडीत ताबडतोड लढाई (War) झाली होती. युद्धभूमीत एकमेकंसमोर भिडत होते भारत आणि पाकिस्तान! या लढाईत दिमाखात भारतानं ऐतिहासिक (Historic) विजय नोंदवला होता. या विजयानंतर एका छोटाशा देशाचा जन्म झाला. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र केल्यानंतर जन्माला आलेला हा देश आता बांगलादेश या नावानं ओळखला जातोय.

गोष्ट पाकिस्तानच्या लाचारीची!

पण जी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय ती बांगलादेशची (Bangladesh) नाही, तर पराभूत झालेल्या पाक (Pakistan) लष्कराची आहे. पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्त्वाचं काय झालं? शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणारे पाकचे लाचार लेफ्टनंट जनरल ए के नियाझी गेले कुठे? या प्रश्नाची कहाणी अचंबित करणारी आहे.

द वॉर दॅट मेड R@AW नावाचं एक पुस्तक आहे. (The War that made R@aw) पुस्तकाचे लेखक आहेत अनुषा नंदकुमार (Anusha Nandkumar) आणि संदीप साकेत (Sandip Saket). त्यांनी या पुस्तकात एक खतरनाक प्रसंग शब्दांत रेखाटलाय.

वर्ष होतं 1971.
तारीख होती 16 डिसेंबर.
ठिकाण – ढाकामधील रमाना ग्राऊंड

पाकिस्तानी सैन्य शरण येण्यास तयार होते. भारतीय लष्कराचे अधिकारी पाहणी करत होते. याच दरम्यान बांगलादेशातील मुक्ती वाहिनीचे शेकडो कार्यकर्ते ट्रकमध्ये बसून घटनास्थळी पोहोचले. या दलाचा म्होरक्या होता टायगर सिद्दीकी! बांगलादेश मुक्ती संग्रामात टायगर सिद्दीकीनं महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली होती.

सिद्दीकी प्रचंड संतापलेला. तो पोहोचताच चवताळला, ‘कुठे आहे नियाजी?’

हे ऐकून JFR जेकब हजर झाले. ते भारतीय लष्करात मेजर जनरल होते. त्यांनीच पूर्व पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला आत्मसमर्पणासाठी तयार केलं होतं. जेकब यांनी सिद्दिकीला थांबवलं आणि त्यांना उद्देशून म्हणाले,

‘सिद्दीकी, एक गोष्ट ऐका. या लढ्यात तुम्ही नक्कीच अप्रतिम कामगिरी केली आहे. आमचे पंतप्रधानही तुमचे कौतुक करतायत. पण, नियाझीच्या केसालाही जर आज धक्का लागला, तर तो शरण येणार नाही. आणि , आपल्याला पुन्हा एकदा युद्धभूमीत उतरावं लागेल. ते ही तुमच्या विरुद्ध!’

JFR जेकब यांचा पारा चढल्याचं पाहून सिद्धीकी धास्तावला. जेकबचं संतापलेलं रुप पाहून सिद्दीकीला धक्काच बसला. पाय आपटत तो परत गेला.

अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण

काही वेळाने नियाझीने ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांसह आत्मसमर्पण केलं. नियाझींनी आत्मसमर्पण पत्रांवर स्वाक्षरी केली. तो क्षण हा भारताच्या लष्करी इतिहासातील अभिमानास्पद क्षण म्हणून आजही आठवला जातो!

 


पुढे भारतीय लष्करातील (Indian Army) अधिकाऱ्यांना बढती मिळाली. तर काहींनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला.

पाकने आपल्या लष्करी नेतृत्वाचे काय केलं?

लेफ्टनंट जनरल नियाझी हा पाकिस्तानच्या पराभवाचा सर्वात मोठा चेहरा बनला होता. नियाझी पाकिस्तानच्या ईस्टर्न कमांडचे प्रमुख होते. लढाईचे शेवटचे दोन दिवस ते पूर्व पाकिस्तानचे लष्करी गव्हर्नरही होते. त्याच नात्यानं त्यांनी शरणागती पत्करलेली. आत्मसमर्पण केल्यानंतर चार दिवसांनी त्यांना कोलकात्यात आणण्यात आलं. त्यांना भारतात युद्धकैदी म्हणून ठेवण्यात आलं होतं.

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात १९७२ मध्ये शिमला करार झाला. या करारानुसार कैद्यांची देवाणघेवाण मान्य झाली. त्यामुळे 30 एप्रिल 1975 रोजी नियाझीला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आलं. त्यांच्यावर पाकिस्तानात कारवाई करण्यात आली. त्याची मिलिट्री रँक कमी करण्यासोबत त्यांची पाकिस्तान सैन्यातून हकालपट्टी करण्यात आली. यासोबतच पेन्शन आणि इतर वैद्यकीय लाभही काढून घेण्यात आले. काही काळानंतर लष्कराने त्यांना पेन्शनही देण्यात आली खरी. मात्र त्यांचं कमी करण्यात आलेलं पद हे तेव्हाही तसंच होतं.

न्यायमूर्ती हमुदूर रहमान समितीने युद्धात पाकिस्तानच्या अपयशाची चौकशी केली. या चौकशीत अनेक भ्रष्ट आणि अनैतिक कृत्यांसाठी नियाझी जबाबदार असल्याचे समितीला आढळून आलं होतं.

या अहवालात एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख नोंदवण्यात आला होता. ही घटना होती ७ डिसेंबर १९७१ची.

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होऊन अवघे चारच दिवस झाले होते. त्या दिवशी पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर ए एम मलिक नियाझीशी बोलले होतं. त्यांना युद्ध परिस्थितीबद्दल काहीतरी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा विचारण्यात आलेला हा प्रश्न ऐकून नियाजींना रडू कोसळलं होतं.

चौकशी समितीच्या अहवालानुसार,

“जनरल नियाझी यांनी लढाईच्या मैदानात बलिदान केलं असतं, तर त्यानंतर इतिहास रचला गेला असता. येणाऱ्या पिढ्यांनी त्यांना महानायक किंवा हुतात्मा म्हणून कायम स्मरणात ठेवलं असतं. पण नियाझी यांनी लढण्याची इच्छाशक्तीच गमावल्याचं या घटनेवरून अधोरेखित झालंय.”

न्यायमूर्ती रहमान आयोगाने पाकिस्तानच्या पराभवासाठी नियाझी यांनाच जबाबदार धरलं. आयोगाने त्यांचा कोर्ट मार्शल करण्याचा सल्लाही दिला. मात्र त्यासाठी कोणत्याही सरकारने शेवटपर्यंत हिंमत दाखवली नाही.

नियाझी काही काळ पाकिस्तानातील राजकारणातही सक्रिय होते. मात्र त्यात ते राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत. 1998 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं नाव आहे – पूर्व पाकिस्तानचा विश्वासघात! या पुस्तकारतून त्यांनी आपली डागाळलेली प्रतिमा स्वच्छ पुरेपूर प्रयत्न केलाय. मात्र यातही नियाझींना यश आलं नाही.

नियाझी यांचे २ फेब्रुवारी २००४ रोजी लाहोर इथं निधन झालं. मरेपर्यंत नियाझी असा दावा करत राहिले की, शरणागतीचा आदेश तत्कालीन राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांनी दिला होता. रावळपिंडीत बसलेले काही लष्करी अधिकारी या पराभवाला जबाबदार असल्याचाही दावा ते करत राहिले. मात्र न्यायमूर्ती रहमान आयोगाने त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही.

पाकिस्तानच्या बाकीच्या नेत्यांचं काय झालं?

याह्या खान त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. पराभवानंतर चार दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याह्याने आपले परराष्ट्रमंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांच्याकडे खुर्ची सोपवली. भुट्टो यांनी त्यांना नजरकैदेतही ठेवले. नजरकैदेतून बाहेर आल्यानंतर याद्या गायबच होते.. अखेर ऑगस्ट 1980 मध्ये रावळपिंडी येथे याह्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

त्यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात लष्करप्रमुख होते गुल हसन खान! पूर्व पाकिस्तानातील अत्याचारांचे आदेश जो माणूस देत होता, तोच हा गुल हसन खान! भुट्टो सत्तेवर आल्यावर त्यांनी गुल हसन यांना पाकिस्तानी लष्कराचं आणखी मोठं पद दिलं. गुल हसन खान यांना कमांडर-इन-चीफ बनवण्यात आलं. मार्च १९७२ पर्यंत ते खान यांनी पाकचे कमांडर-इन-चीफ म्हणून काम पाहिलं. नंतर त्यांना ग्रीस आणि ऑस्ट्रियामध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. भुट्टो यांच्यावर १९७७च्या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप होता. याच्या निषेधार्थ गुल हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. 1999 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

अशाच प्रकारे इतरही अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पराभवानंतरही बढती आणि प्रसिद्धी मिळाली. पण नियाझी यांना यातलं काहीच मिळालं नाही. पाकच्या पराभवाचे व्हिलन म्हणूनच नियाझी यांच्याकडे पाहिलं गेलं!

एवढं सगळं असूनही, पाकिस्तान सरकारने नियाझीवर प्रचंड मेहरबानी केली! इतकी की बांगलादेशात झालेल्या युद्ध गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षादेखील केली नाही. पाकिस्तानने ते गुन्हे कधीच स्वीकारले नाहीत आणि त्याबाबत माफीही मागितली गेली नाही. अर्थात ही शिक्षा न करण्यामागे एक मोठा कटही असल्याचं जाणकार सांगतात. कारण जर नियाझी यांना शिक्षा केली गेली असतील, तर याचा अर्थ स्पष्टपणे त्यांना हे गुन्हे करण्यासाठी पाकिस्ताननंच हिरवा कंदील दाखवलाय, हे सिद्ध झालं असतं. त्यामुळे आपला काळा चेहरा लपवण्यासाठी लाचारी पत्करणं हे पाकिस्तानला कदाचित जास्त भावलं असावं!

संबंधित बातम्या –  

पाकिस्तानी कट्टरपंथीय आक्रमक, महाराजा रणजीत सिंग यांच्या पुतळ्याची विटंबना

Video : पाकिस्तानात लहानग्यांना दिली जातेय हत्या करण्याची ट्रेनिंग!