डोनाल्ड ट्रम्प म्हणजे डबल ढोलकी! रशियासोबत व्यापार केल्याने जगावर लादला कर, मात्र आता अमेरिकाच करतेय मुक्तपणे व्यापार

डोनाल्ड ट्रम्प यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे. ट्रम्प रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कर लादत आहेत, मात्र ते आता स्वतः रशियासोबत व्यापार करत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प म्हणजे डबल ढोलकी! रशियासोबत व्यापार केल्याने जगावर लादला कर, मात्र आता अमेरिकाच करतेय मुक्तपणे व्यापार
Russia usa meeting
| Updated on: Aug 16, 2025 | 9:53 PM

शुक्रवारी (15 ऑगस्ट) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अलास्कामध्ये बैठक झाली. यावेळी रशिया-युक्रेन युद्ध आणि व्यापार करार बाबत चर्चा झाली, मात्र अंतिम करार झाला नाही. या बैठकीनंतर ट्रम्प आणि पुतीन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुतीन यांनी ट्रम्प सत्तेत आल्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाढला असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे. कारण ट्रम्प रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कर लादत आहेत, मात्र ते आता स्वतः रशियासोबतही व्यापार करत आहेत.

अलास्कात दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर बोलताना पुतीन म्हणाले की, ‘अमेरिकेत नवीन सरकार आल्यापासून, अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार वाढला आहे. यात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. आपल्याकडे एकत्र काम करण्याचे आणि व्यवहार करण्याचे अनेक मार्ग आहेत.’ त्यामुळे आता अमेरिका आणि रशियामध्ये काही व्यापार करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिजिटल, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

अमेरिका रशियासोबत व्यापार का करत आहे?

डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्व देशांवर रशियासोबत व्यापार न करण्यासाठी दबाव आणत आहेत, मात्र ते स्वतः रशियासोबतचा व्यापार थांबवू शकत नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार वाढला आहे. हा व्यापार थांबला तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. त्यामुळे अमेरिका आपल्या प्रमुख व्यापारी देशाला गमावू शकत नाही.

अमेरिका रशियाच्या या गोष्टींवर अवलंबून

खते- अमेरिकन जनगणना ब्युरोच्या आकडेवारीनुसार, अमेरिका रशियन खतांवर अवलंबून आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत $927 दशलक्ष किमतीची खते आयात केली आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेने रशियाकडून $1 अब्ज पेक्षा किमतीची खते आयात केली होती. युरिया, युरिया अमोनियम नायट्रेट (UAN) आणि पोटॅशियम क्लोराईड म्युरेट ऑफ पोटॅश या रशियन खतांची खरेदी अमेरिका करत आहे.

पॅलेडियम- अमेरिका रशियाकडून पॅलेडियमची आयात देखील करते. अमेरिकेने 2024 मध्ये 878 दशलक्ष डॉलर्स आणि 2025 मध्ये 594 दशलक्ष डॉलर्सचे पॅलेडियम आयात केले आहे. या धातूचा वापर विविध इलेक्ट्रॉनिक आणि औद्योगिक उत्पादनांमध्ये होतो. कारच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये पॅलेडियम हा एक प्रमुख घटक आहे. तसेच युरेनियम आणि प्लुटोनियम देखील रशियाकडून आयात केले जाते.