Nepal Flood : एका पुराने रावाचा रंक झाला… कोट्यवधीचा मालक आज एका शर्टासाठी भिकेला… सर्व काही गेलं… ढसाढसा रडत म्हणाला…
नेपाळमधील महापुराने त्रिशूली बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत भारतीय व्यावसायिक अशोक कुमार चौरसिया यांनी ४५ कोटींहून अधिक रकमेचा व्यवसाय, घर आणि कुटुंबही गमावलं. क्षणार्धात सर्व काही नष्ट झालं.

नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या महापुराने हाहा:कार माजला. भीषण जलप्रलयाने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. महापुराच्या तडाख्यात अनेक गावे आणि वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. क्षणभरापूर्वी हसणाऱ्या माणसांच्या डोळ्यात पुराने अक्षरश: पाणी आणलं. या पुरात काहींनी जीव गमावला, तर काहींचा जीव वाचूनही बाकी सगळं गेलं, त्यांचे आप्तस्वकीय गायब झाले, घर उद्धवस्त झालं. सगळं क्षणात उद्ध्वस्त करणारी ही नैसर्गिक आपत्ति काहींना मुळापासून हादरवून गेली. याच पुरामुळे अनेक गावही विखुरली. एकेकाळी कोट्यवधींच्या व्यापाराने गजबजलेला त्रिशूली बाजार आज पूर्णपणे ओसाड झाला आहे. जिथे मोठमोठी दुकानं आणि घरं होती, तिथे आता फक्त भग्नावशेष आणि उद्ध्वस्त इमारती दिसत आहेत.
या भीषण आपत्तीचा सर्वाधिक फटका बसलेल्या व्यावसायिकांमध्ये भारतीय नागरिक अशोक कुमार चौरसिया यांचाही समावेश आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आणि मालमत्ता असलेल्या अशोक यांनी या महापुरात अक्षरशः सर्वस्व गमावले. त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की, आज त्यांच्या अंगावर घालण्यासाठीही स्वतःचे कपडे नाहीत. इतरांकडून कपडे मागून ते कसबसं जगत आहेत, आपला उदरनिर्वाह करत आहेत. या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील वहिनी आणि पुतण्याचाही मृत्यू झाला. अंगावर आलेली बिकट परिस्थिती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
त्रिशूली बाजारात 20 वर्षांपासून होतं दुकान
त्रिशूली बाजारात जवळपास 60 हून अधिक भारतीय कुटुंबं रहात होती. मात्र आता तिथे फक्त घरं आणि दुकानांचे सांगाडे दिसत आहेत. अशोक कुमार चौरसिया यांनीही त्याचं सर्वस्व गमावलं. ते मूळचे उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील रसडा येथील रहिवासी आहेत. मात्र गेल्यआ 44 वर्षांपेक्षा अधिक काळ ते नेपाळमध्ये राहतात. 20 वर्षांहून अधिक काळ त्रिशूली बाजारात त्यांचं दुकान होतं. त्यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. चार दुकानं आणि चार गोदामंही होती.नुवाकोट जिल्ह्यातील मोठ्या घाऊक कपड्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना व्हायती.
महापुरात 45 कोटींहून अधिक नुकसान
मात्र या महापुरामुळे त्याचं प्रचंड नुकसान झालं. अशोक यांच्या सांगण्यानुसार, त्या दिवशी सकाळी त्यांनी दुकान उघडलं आणि त्याच वेळी पोलिसांनी पाण्याची पातळी वाढत असल्याची सूचना देत त्यांना सतर्क केलं. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलांना उठवलं आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 100 किलोमीटर अंतर पार करत पुराचे पाणी अवघ्या 20 मिनिटांत त्रिशूलीपर्यंत पोहोचलं आणि त्यांच्या डोळ्यांदेखतच त्याचं सर्व काही वाहून गेलं.
अशोक यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्याकडे 4 दुकानं, 4 गोदाम , एक मारूती कार आणि एक स्कूटी होती. मात्र पुराच्या विध्वंसामुळे त्यांचं 45 कोटींहून अधिक नुकसान झालं. त्यांनी सगळं गमावलं, परिस्थिती एवढी बिकट की काही खायला प्यायलाही पैसे उरले नाहीत, अगदी 100 रुपयेही जवळ नव्हते, असं ते साश्रूनयनांनी म्हणाले.
या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातील चार जण वाचले असून त्यापैकी दोन जणांना भारतात पाठवण्यात आलं आहे. मात्र व्यवसाय, घर, मालमत्ता आणि जवळची माणसे गमावल्यानंतर अशोक यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.