ट्रम्प यांचा मोठा पराभव..? मध्यावधी निवडणुकीपूर्वीच झटका; सर्व्हेचे धक्कादायक आकडे समोर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. एका नव्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या घटली आहे. इराणसोबतचा संघर्ष आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था या प्रमुख चिंतांमुळे अनेक मतदार त्यांच्या विरोधात आहेत. हे आकडे ट्रम्प यांच्या संभाव्य पराभवाकडे निर्देश करत आहेत.

अमेरिका- इराण युद्ध आणि मध्य पूर्वेतील अशांतता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होत आहेत. या मध्यावधी निवडणुकांचा सर्व्हे आला आहे. सर्व्हेचे आकडे अत्यंत धक्कादायक आहेत. येत्या निवडणुकीत ट्रम्प यांचा मोठा पराभव होणार असल्याचे संकेत देणारे हे आकडे आहेत. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
एनबीसी न्यूजच्या एका नव्या सर्व्हेनुसार, मध्यावधी निवडणुकामध्ये अमेरिकेतील मोठ्या प्रमाणावरील मतदार ट्रम्प यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. न्यूयॉर्क येथील या टीव्ही चॅनलने गेल्या 30 वर्षातील मध्यावधी निवडणुकीचे सर्वात आश्चर्यकारक आकडे दिले आहेत. हे आकडे धक्कादायक आहेत आणि सर्वाधिक आश्चर्यकारक आहेत, असं या चॅनलने म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्या विरोधात जनमत किती?
या सर्व्हेनुसार, 43 टक्के नोंदणीकृत मतदारांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे. फक्त 27 टक्के मतदारांनी ट्रम्प यांचं समर्थन केलं आहे. तर 28 टक्के मतदारांनी आम्हाला कोणताही विशेष मेसेज द्यायचं नाहीये, असं स्पष्ट केलंय. तर स्वतंत्र मतदारांपैकी 46 टक्के मतदारांनी ट्रम्प यांना विरोध केला आहे. केवळ 10 टक्के स्वतंत्र मतदारांनीच ट्रम्प यांचं समर्थन केलं आहे.
20 सप्टेंबर रोजी ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था, अमेरिकेत राहण्यासाठी लागणारा खर्च, इराणसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेलं युद्ध आदी गोष्टींमुळे अमेरिकन मतदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याशिवाय ट्रम्प यांच्या वैयक्तिक कामगिरीची रेटिंगही घसरली आहे.
ट्रम्प यांची देश चालवण्याची पद्धत योग्य असल्याचं 41 टक्के नागरिकांनी म्हटलं आहे. तर 56 टक्के नागरिकांनी ट्रम्प यांच्या देश चालवण्याच्या पद्धतीला नापसंती दर्शवली आहे. एनबीसी न्यूजच्या मते, ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वाधिक कमी रेटिंग मिळाली आहे. हा सर्व्हे 11 ते 15 सप्टेंबर दरम्यानचा आहे. 1,000 नोंदणीकृत मतदारांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता.
इराण युद्धावर मत काय?
या सर्व्हेतून आणखी एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेतील मतदार देशाच्या अर्थव्यवस्थेवरून चिंतीत असल्याचं आढळून आलं आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचं 55 टक्के मतदारांचं म्हणणं आहे. मार्चमध्ये केवळ 48 टक्के मतदारांना तसं वाटत होतं. म्हणजे अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात सात टक्के मतदार गेले आहेत. ही ट्रम्प यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. तर 26 टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या धोरणांचं समर्थन केलं आहे. महागाई आणि जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीही चिंतेचा विषय असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इराण सोबत युद्ध करणं योग्य नाही, असं 62 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर, 33 टक्के मतदारांनी मात्र या युद्धाचं समर्थन केलं आहे.