48 तास ढिगाऱ्याखाली दोघे, अखेर पत्नीचा मृतदेह सोडत शरीर ओढत बाहेर निघाला, समोर 2 लेकी निष्प्राण! ही दुर्दैवी वेळ कुणावरही नको…

तुर्की आणि सीरीयात सोमवारी झालेल्या विध्वंसक भूकंपाचे अत्यंत भीतीदायक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. कुठे नुकतीच जन्मलेली बाळं ढिगाऱ्याखाली गाढली गेली तर कुठे जखमांनी विव्हळणारी लहान मुलं आपल्या पालकांना आतुरतेनं शोधत आहेत.

48 तास ढिगाऱ्याखाली दोघे, अखेर पत्नीचा मृतदेह सोडत शरीर ओढत बाहेर निघाला, समोर 2 लेकी निष्प्राण! ही दुर्दैवी वेळ कुणावरही नको...
Image Credit source: social media
| Updated on: Feb 09, 2023 | 11:10 AM

एखाद्या विध्वंसक आपत्तीत आपल्याभोवतीचं जगच कोसळून जावं…चहुबाजूंनी खाडकन् अंधार व्हावा.. जागं होताच पाहिलं तर शरीरावर असह्य ओझं. शरीर दबलेलं, श्वास दबलेला. बाजूला पत्नीचा मृतदेह… कसा बसा श्वास घेत, ढिगाऱ्याखालून अंग पुढे ढकलण्याची झुंज सुरु व्हावी, तब्बल 48 तासानंतर ढिगारा सुटतो अने मोकळ्या हवेत यावं अन् पाहतो तो दोन लेकींचे मृतदेह.. अख्खं कुटुंबच निष्प्राण अवस्थेत पडलेलं. एवढी भीषण आणि दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये. पण निसर्ग कोपला तर किती भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं, हे तुर्की आणि सीरीयात झालेल्या भूकंपानं दाखवून दिलंय. ही एक घटना नाही तर अशा हजारो कुटुंबांना आपल्या माणसांचे गतप्राण झालेले शरीरं पाहण्याची वेळ या भूकंपाने आणली आहे.

तुर्की आणि सीरीयात सोमवारी झालेल्या विध्वंसक भूकंपाचे अत्यंत भीतीदायक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. कुठे नुकतीच जन्मलेली बाळं ढिगाऱ्याखाली गाढली गेली तर कुठे जखमांनी विव्हळणारी लहान मुलं आपल्या पालकांना आतुरतेनं शोधत आहेत. अशातच तब्बल 48 तास ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आलाय.

तुर्कीतील हते सिटीतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर या भूकंपाची भीषणता दाखवतोय. एक व्यक्ती पत्नीच्या मृतदेहासोबत ढिगाऱ्याखाली गाढला गेला होता. या व्यक्तीचं नाव अब्दुललीम मुआइनी असं आहे. मुआनीला त्याची पत्नी आणि दोन मुलींसह एका भग्न इमारतीतून बाहेर काढण्यात आलं.

ढिगाऱ्यांखाली दबून मृत झालेले अशा अनेक मृतदेहांचा खच पडलेली छायाचित्र तुर्कीतून समोर येत आहे. ढिगाऱ्याखालून प्राण वाचवत जे लोक बाहेर येतायत, ते आपल्या माणसांचे मृतदेह पाहून आणखीच व्याकुळ होतायत. 16 वर्षांच्या महमूद सलमानला 56 तासानंतर बाहेर काढण्यात आलं. बचाव पथकानं आरिफ नावाच्या मुलाला एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. 10 वर्षाचा बैतूल एडिस अदियामन शहरात त्याच्या घराच्या अवशेषांखाली दबला होता. त्याला बाहेर काढण्यात आलं तेव्हा नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तुर्की आणि सीरियातील भयंकर भूकंपाने मृत पावलेल्यांची संख्या आथा ११ हजारांच्या पुढे पोहोचली आहे. फक्त तुर्कीत 9 हजार मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बचाव पथक आणि स्थानिक सरकार अहोरात्र मदतकार्य करत आहेत. तर संकटातून बचावलेले लोक आपल्या माणसांच्या गमावण्याने व्याकुळ झालेत तर कुणी स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या मदतीसाठी तयार झालेत.
तुर्की सरकारने सर्वाधिक नुकसान झालेल्या १० प्रांतात आणीबाणी घोषित केली आहे. जगातील 24 पेक्षा जास्त देशांतील बचाव पथकं या मोहिमेत सहभागी झाले आहेत.